Breaking : अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्र्यांची 'लास्ट वॉर्निंग', यापुढे अशी वक्तव्य केली तर...

अब्दुल सत्तार यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका, मुख्यमंत्र्यांनी दिली लास्ट वॉर्निंग

Updated: Nov 8, 2022, 06:35 PM IST
Breaking : अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्र्यांची 'लास्ट वॉर्निंग', यापुढे अशी वक्तव्य केली तर... title=

Maharashtra Politics :  गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविषयी बोलताना अब्दुल सत्तार यांनी अश्लाघ्य भाषेत टीका केली. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंना अपशब्द वापरण्यावरुन राष्ट्रवादी (NCP) आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात  राज्यभर निदर्शनं करण्यात आली. सुप्रिया सुळेंना अपशब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केलीय. 

दरम्यान याप्रकरणाची आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही गंभीर दखल घेतली आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षासह स्वत:ला अडचणी  आणणारे  कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तारांना मुख्यमंत्र्यांकडून 'लास्ट वॉर्निंग' देण्यात आली आहे. तसंच सत्तारांना माध्यमांपासूनही लांबच राहण्याचा मुख्यमंत्री यांनी सल्ला दिल्याची सूत्रांची माहिती आहे. माध्यमांना पक्षातील मुख्य नेते आणि प्रवक्ते हेच प्रतिक्रिया देतील असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे.  तसंच यापुढे कुठल्याही वादात सत्तारांचे नाव आल्यास मंत्रीपद अडचणीत येऊ शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

काय बोलले होते सत्तार?
संभाजीनगरमधल्या सिल्लोड इथं खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची काल जाहीर सभा झाली. यावेळी अब्दुल सत्तार यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला.  सुप्रिया सुळेंनी 50 खोके मिळाले का, असा प्रश्न अब्दुल सत्तारांना केला होता. यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का, असा प्रतिप्रश्न केला होता. सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देत तुमच्याकडे असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका केली होती. यावर बोलताना सत्तार यांची जीभ घसरली. सुप्रिया सुळे यांचा एकेरी उल्लेख करत 'इतकी भिकारxx झाली असेल तर तिलाही देऊ' असं वादग्रस्त वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे. जे आम्हाला खोके बोलतात त्यांच्या डोक्यात खोके भरले असल्याची टीकाही सत्तार यांनी केली आहे. 

राष्ट्रवादीकडून राज्यभर आंदोलन
कृषिमंत्री अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादीकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येतंय. कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात सत्तारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला. सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी  करण्यात आली. तर जालन्यात महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलकांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचे फोटो जाळले.