Viral News: लग्नाची वेळ जवळ आली आणि नवरी लिफ्टमध्ये अडकली; 25 मिनिटांत सगळा गोंधळ झाला

Bhayandar Bride Viral News: लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो. भाईदंर येथे एका नवरी मुलीसह असा प्रकार घडला आहे की ते कधीच विसरु शकत नाही. 

वनिता कांबळे | Updated: May 31, 2023, 01:21 PM IST
Viral News: लग्नाची वेळ जवळ आली आणि  नवरी लिफ्टमध्ये अडकली; 25 मिनिटांत सगळा गोंधळ झाला title=

Bhayandar Viral News: लग्नाच्या काही क्षणाआधीच नवरी लिफ्टमध्ये अडकली. भाईंदरमध्ये ही घटना घडली आहे. यामुळे सगळीच तारांबळ उडाली. तब्बल 20 मिनीटे ही नवरी लिफ्टमध्ये अडकली होती. या प्रकारामुळे लग्न सभागृहात एकच गोंधळ उडाला. अखेरीस नवरीची लिफ्टमधुन सुटका झाल्यावर ती लग्नमंडपात पोहचली. 

काय झालं नेमकं?

भाईंदर येथील विनायक नगरमधील एका सभागृहात हा लग्नसोहळा सुरू होता. लग्नाचा मुहूर्त जवळ आला होता. त्यामुळे सगळे जण नवरीची वाट बघत होते. नवरी आणि काही मंडळी तळघरातून लग्नठिकाणी लिफ्टमधून येत होती. त्यावेळी अचानक लिफ्ट बंद पडली. लग्नाची वेळ जवळ आली असतानाच नवरी लिफ्टमध्ये अडकल्याने सगळीच तारांबळ उडाली. अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत 20 मिनिटांनंतर नवरीची सुटका झाली. त्यानंतर लग्नसोहळा पार पडला.

अखेर नवरी बोहल्यावर चढली

मुहूर्ताची वेळ जवळ आली. मंगलाष्टकं सुरू होत होती. नव-या मुलीला घेऊन या... असं गुरुजींनी सांगितलं.  सगळ्यांचं लक्ष नव-या मुलीच्या एन्ट्रीकडे लागलं. पण नव-या मुलीचा पत्ताच नाही. नवरीची शोधाशोध सुरू झाल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार. नटून थटून मंडपात यायला निघालेली नवरी चक्क लिफ्टमध्ये अडकली होती. भाईंदरमधल्या विनायक नगरमधल्या एका लग्न कार्यालयात हा प्रकार घडला. लग्नाच्या हॉलच्या लिफ्टमध्ये अडकलेली नवरी आणि व-हाडींना सोडवण्याची एकच धावपळ सुरू झाली. नवरी तळघरातून वरच्या मजल्यावर येत होती, तेवढ्यात लिफ्ट बंद पडली. अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं.

25  मिनिटांनी लिफ्ट उघडली

अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करुन 25 मिनिटांनी लिफ्ट उघडली. नवरी आणि व-हाडी लिफ्टमध्ये पार गुदमरून गेले होते. सगळे बाहेर पडले ते अक्षरशः धापा टाकतच.  नवरीनं बाहेर पडताच वडिलांना मिठी मारली. तिला पाणी देण्यात आलं.  खुर्चीवर बसवून वारा घातला. लिफ्टमध्ये अडकलेल्यांना पाणी देण्यात आलं. लहान मुलांना तर तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. काही व-हाडींनाही तातडीनं मंडप सोडून आराम करण्यासाठी घरी जावं लागलं. लग्नामध्ये अचानक आलेल्या या संकटामुळे व-हाडी पुरते हादरुन गेले होते. लग्नामध्ये लिफ्टनं घातलेला हा गोंधळ तब्बल 25 मिनिटं चालला. अखेर नवरी बोहल्यावर चढली आणि मुहूर्त टळण्याआधी विवाह संपन्न झाला. लग्नात शुभमंगलाआधी सावधान म्हणजे काय, त्याचा पुरेपूर अनुभव व-हाडींनी घेतला.