प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : ओव्हर टेक करायला दिलं नाही म्हणून कॅब ड्रायव्हरचा खून केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडलीय. या प्रकरणी दोघांना अटक झालीय, तर तिसऱ्याचा शोध सुरू आहे.
सलीम शेख... मुंबईत खासगी टॅक्सी चालवण्याचा व्यवसाय करायचे... मात्र रस्त्यात झालेला क्षुल्लक भांडणाने त्यांचा जीव घेतला. सोमवारी संध्याकाळी सलीम शेख गोवंडीच्या शिवाजीनगर भागातल्या अहिल्याबाई होळकर मार्गावर कॅब घेऊन चालले होते. रोडनंबर ३ इथे असलेल्या गर्दीमुळे बाजूने जाणाऱ्या मोटर सायकल स्वाराला ओव्हरटेक करण्यास वेळ लागला.
त्यामुळे संतापलेल्या मोटर सायकल स्वाराने ओव्हरटेक करू न दिल्याचा आरोप केला आणि शेख यांना मारहाण केली. या मारहाणीत सलीमचा जागेवरच मृत्यू झाला. पोलिसांनी इम्रान शेख, अब्दुल रहीम यांना अटक केलीय. तर वाजिद अली हा तिसरा आरोपी फरार आहे.
पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून या तीनपैकी दोघा आरोपींना पकडलंय. मात्र रस्त्यातलं क्षुल्लक कारणावरचं भांडण थेट शेख यांच्या जीवावर बेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.