सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांनी मुंबई दौऱ्याची सुरूवात लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja) दर्शनाने केली. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शाह यांचं स्वागत केलं. तिथून शाह आपल्या कुटुंबीयांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले.
अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं पूजन केलं, बाप्पाच्या चरणांवर डोकं ठेऊन अमित शाह यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. लालबागमधून अमित शाह आता बांद्र्याकडे रवाना झालेत. तिथे त्यांनी आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचं दर्शन घेतलं. त्यानंतर अमित शाहांनी सहकुटुंब फडणवीसांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.
भाजपचं 'मिशन मुंबई'
अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याचा मुख्य उद्देश हा मुंबई महापालिका निवडणुकीची (Mumbai Municipal Election 2022) रणनीती ठरवणं हाच आहे. त्यासाठी अमित शाह आज मुंबईत महत्त्वाच्या बैठका घेत आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर मुंबई मनपा निवडणुकीसाठी बैठक होतेय. मुंबईतले भाजप नगरसेवक- आमदार बैठकीसाठी उपस्थित आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडतेय. मुंबई आणि एमएमआर भागातल्या मनपांची रणनीती या बैठकीत ठवण्यात येत आहे. अमित शाह मुंबई आणि एमएमआरमधल्या आमदारांना आणि नगरसेवकांना अमित शाह मार्गदर्शन करत आहेत.
त्यानंतर अमित शाह भाजप कोअर कमिटीशी बैठक करणार आहेत. भाजपने मुंबई मनपात 135 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. मुंबई मनपासह मुंबई परिसरातल्या महापालिका तसंच राज्यातल्या इतर महापालिकांमध्येही भाजपची सत्ता आणण्याचा निर्धार भाजपने केलाय.
देवेंद्र फडणवीस हे राज्यात भाजपाचा मुख्य चेहरा असणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप महापालिकेची निवडणूक लढवेल. फडवणीस यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये बूथ रचना, प्रभाग रचना, पदाधिकारी, कार्यकर्ते अशी रचना भाजपची असते त्यानुसार काम करण्याची सूचनाही फडणवीस यांनी केली आहे.
मुंबई महापालिका भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे, राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर भाजपने आता मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मुंबई मनपावर गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. महापालिकेचं वर्षाचं बजेट 50 हजार कोटींहून अधिक आहे. महापालिका हातातूतन गेल्यास सेनेची मोठी कोंडी होणार आहे. त्यादृष्टीने भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत.
2017 मध्ये भाजपने 32 जागांवरुन 81 जागांवर उडी घेतली आहे. आता अमित शाह यांच्या दौऱ्यात 135 जागांचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे.