मुंबई: कल्याणमधील पत्री पूल अखेर १८ तारखेला पाडण्यात येणार आहे. या पाडकामासाठी येत्या रविवारी मध्य रेल्वेने विशेष जम्बोब्लॉकची घोषणा केलेय.
त्यामुळे रविवारी सहा तासांसाठी कल्याण स्थानकातून होणारी अप आणि डाऊन दिशेची वाहतूक बंद राहील. सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत पाडकाम केले जाईल.
अंधेरीतील पूल दुर्घटनेनंतर सगळ्या जुन्या पुलांचे ऑडिट करण्यात आले. ज्यामध्ये कल्याणचा पत्री पूल हा धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे प्रशासनाने हा पूल पाडून नवा पूल बांधायचा निर्णय घेतला होता.
मात्र, मुंब्रा बायपासचे काम सुरू असल्याने कल्याण शहरावर वाहतुकीचा अतिरिक्त ताण पडला होता. त्यामुळे हा पूल पाडायचा मुहूर्त निश्चित होत नव्हता.
दरम्यान, एमएसआरडीसीने तीन महिन्यांत या जागी नवा पूल बांधणार असल्याचे सांगितले होते.