राज ठाकरे यांना उद्धव यांचे निमंत्रण, शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार

महाराष्ट्रात ठाकरे सरकार असणार आहे.  उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.  

Updated: Nov 28, 2019, 02:41 PM IST
राज ठाकरे यांना उद्धव यांचे निमंत्रण, शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार
संग्रहित छाया

मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे सरकार असणार आहे.  उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. शपथविधी सोहळ्याचे उद्धव ठाकरे यांच्याकडून राज यांना फोनवरून निमंत्रण देण्यात आले आहे. राज यांनीही निमंत्रण स्वीकारले आहे. शिवतीर्थावर राज-उध्दव एकत्र येणार आहे, याची उत्सुकता सगळ्यांना आहे. त्याचबरोबर कलाकारही उपस्थित राहणार आहे. बिग बी अमिताभ बच्चन,  आमीर खान, माधुरी दीक्षित, आशा भोसले यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहोत.  उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचाही आज शपथविधी होणार आहे. उद्धव यांचा शपथविधी हा सर्व शिवसैनिकांसाठी एक आनंदाचा सोहळा असणार आहे. तसेच  ठाकरे कुटुंबातील आनंदाच्या क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना राज ठाकरे उपस्थित राहतील.  

ठाकरे कुटुंबातून आतापर्यंत कोणीही निवडणूक लढवली नव्हती. पण आता आदित्य ठाकरेंना आमदारकी आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद असा दुहेरी आनंदाचा क्षण ठाकरे कुटुंबासाठी आहे. त्यामुळे या क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे शिवाजी पार्क परिसरातच ‘कृष्णकुंज’मध्ये राहतात. त्यामुळे शपथविधीला ते पत्नी, मुलगा, सून, मुलगी आणि मातोश्री यांच्यासह उपस्थित राहतील, असा विश्वास आधीपासूनच व्यक्त केला जात होता.