मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या कित्येक वर्षांपासून सक्रिय असणाऱ्या आणि या राज्याचं मुख्यमंत्रीपद भुषवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. शिवसेना या पक्षासोबतत आव्हानाच्या प्रसंगात राज्याची धुराही तितक्चाय संयमानं आणि जबाबदारीनं सांभाळणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जनतेची साथ आणि अर्थातच जनतेचं प्रेमही मिळालं.
आएएनएस आणि सीव्होटर्स या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाच्या अहवालात उद्धव ठाकरे हे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट झालं. आपल्या वाट्याला आलेलं जनतेचं हे प्रेम पाहता त्यांनी सर्वांचेच सहृदय आभार मानले आहेत.
एका जाहीर पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राला जगभरात अव्वल स्थानी आणण्याचा मानसही व्यक्त केला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
''लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझा समावेश झाला, हे माझे एकट्याचे यश नाही. सहा महिन्यांच्या काळात शिवरायांचे हे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रकाचे यश आहे. मुख्यमंत्रीपद हे निमित्त आहे. महाराष्ट्राची सेवा घडत आहे हे महत्त्वाचं. लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल हेच माझे ध्येय आहे.''
संकटसमयी ठाकरे यांनी घेतलेल्या प्रत्येक भूमिकेचं सर्व स्तरांतून कौतुक झालं. पण, या काळात आपल्याला मंत्रीमंडळाचीही साथ असल्याचं त्यांनी या पत्रकातून स्पष्ट केलं. सोबतच त्यांनी सर्व मंत्रीमंळाचेही आभार मानले.