रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, परिवहन विभागाला दिले स्पष्ट निर्देश

रिक्षा-टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.  यापुढे रिक्षा-टॅक्सी चालकांना विम्याचे संरक्षण, कुटूंबियांना मोफत उपचार, ग्रॅज्युईटी आणि मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. 

कपिल राऊत | Updated: Jun 18, 2024, 08:43 PM IST
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, परिवहन विभागाला दिले स्पष्ट निर्देश title=

मुंबई : शहरातील रिक्षा आणि टॅक्सी चालवून प्रतिदिनी हातावर पोट असलेल्या लोकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांच्या पुढाकाराने भेटीसाठी आलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाच्या (Rickshaw-Taxi Drivers Delegation) प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी या महामंडळाच्या अंतर्गत मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली. 

मुंबईत रिक्षा आणि टेक्सी चालकांना परिवहन विभागाकडून (Transort Department) जो अतिरिक्त दंड आकारला जातो तो यापूढे आकारला जणार नाही असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. तसे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाच्या आयुक्त आणि पोलीस उपयुक्तांना दिलेत. मात्र त्यासोबतच नियम मोडला असेल तर मात्र हा दंड आकारला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यासोबतच रिक्षा टॅक्सी चालकांसाठी 'महाराष्ट्र टॅक्सी ऑटोरिक्षा चालक मालक कल्याणकारी महामंडळ' सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितलं. 

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सुविधा
या महामंडळाअंतर्गत प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकाला जीवन विमा कवच देण्यात येईल, रिक्षा-टॅक्सी चालकांसह त्यांच्या कुटूंबियांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी तरतूद करण्यात येणार आहे. अपघातात अचानक कुणी जखमी झाल्यास त्याला तातडीची मदत म्हणून 50 हजार देण्यात येणार आहे. ज्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांच्या मुलांना शिकायचे असेल त्याना शिष्यवृत्ती तसंच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येईल, त्यांच्या मुलांना कौशल्यविकास विभागाच्या माध्यमातून तंत्रकुशल केले जाईल तसेच मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळेल.

यासोबतच शासनाचा जर्मन सरकारसोबत चार लाख तंत्रकुशल मनुष्यबळ पुरवण्याचा करार झाला असून त्याअंतर्गत कुशल चालकांना परदेशी नोकरीसाठी जाण्याची संधी मिळेल. 63 वर्षावरील चालकांना ग्रॅज्युईटी मिळावी यासाठी देखील तरतूद करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक चालकाला वर्षाला 300 रुपये म्हणजे प्रतिमहिना 25 रुपये जमा करावे लागतील तर त्यात उर्वरित भर शासनाकडून टाकण्यात येईल. त्यासाठी उद्योग, खनिकर्म आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात येईल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

येत्या काही दिवसात या महामंडळाची रुपरेषा अंतिम करून परिवहन विभागाच्या कार्यालयात स्वतंत्र खिडकी उघडून त्यामाध्यमातून कार्ड काढून या महामंडळाचे लाभ रिक्षा टॅक्सी चालकांपर्यंत पोहचवण्यात येतील. दररोज कमावून पोट भरणाऱ्या कष्टकरी वर्गाला दिलासा मिळावा यासाठी हे महामंडळ सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं. मात्र एकेकाळी स्वतः रिक्षाचालक असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकाळात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आपल्यावतीने दिलेले ही अनोखी भेट ठरली आहे.