'पियुषजी गेल्यावेळचं बोलणं मनाला जास्तचं लावून घेतलंत'

मुख्यमंत्र्यांनी पियुष गोयल यांचे मानले आभार 

Updated: May 31, 2020, 10:03 PM IST
'पियुषजी गेल्यावेळचं बोलणं मनाला जास्तचं लावून घेतलंत'

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत. पीयूष गोयल यांना मागच्या वेळी बोललो तर राग आला आता मी धन्यवाद देतोय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पियुल गोयल यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्राने आतापर्यंत १६ लाख मजुरांना मूळगावी सोडलं आहे. याकरता त्यांनी पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत. 

लॉकडाऊननंतर परराज्यातील मजुरांचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यांना आपल्या मुळगावी कसे सोडता येईल? हा प्रश्न अत्यंत महत्वाचा होता. अनेक मजुर पायी आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. काहींनी यामध्ये आपला जीव देखील गमावले. मात्र रेल्वेने १६ लाख मजुरांना रेल्वेने आपल्या मूळगावी पोहोचवले असल्यामुळे उद्धव ठाकरेंनी रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले आहेत. (लॉकडाऊन ५ : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निकालाबाबत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय) 

परराज्यात रेल्वे सोडण्यावरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध केंद्र सरकार आणि भाजप हा संघर्ष चिघळला होता. परराज्यातील मजुरांना सोडण्यासाठी रेल्वेकडून मागणीनुसार गाड्या मिळत नसल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे १२५ गाड्या उद्या द्यायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी या गाड्यांचा मार्ग, प्रवाशांची यादी प्रत्येकाच्या मेडिकल सर्टीफिकेटसह रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे जमा करावी असं ट्विट करत एक प्रकारे राज्य सरकारला आव्हान दिलं होतं. दीड तासाने रेल्वे मंत्र्यांनी पुन्हा ट्विट करून ही यादी मिळाली नसल्याचा दावा केला.  (लॉकडाऊन कचऱ्याच्या टोपलीत, मुख्यमंत्र्यांचं 'पुनश्च हरी ओम'!)

हा वाद वाढतच गेला. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील उडी घेतली होती. यासगळ्या प्रकरणाला प्रत्युत्तर  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलं. संजय राऊत यांनी ट्विटरवरून पियूष गोयल यांना सणसणीत टोला लगावला. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पियुषजी, फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचु नये, असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले.