मुंबई : लॉकडाऊन ५ सुरू व्हायच्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. लॉकडाऊनला आता कचऱ्याच्या टोपलीत टाकायचं आहे आणि पुनश्च हरी ओम करण्याची वेळ आली आहे. आपण आता नव्या आयुष्याची सुरुवात करत आहोत, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
बाहेर पडत असताना मास्क लावा, हात वारंवार धुवा आणि चेहऱ्यावरून हात फिरवू नका. आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकायचंय, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं आहे. ३ तारखेपासून आपण पुन्हा हात-पाय हलवायला सुरुवात करुया, असं मुख्यमंत्री म्हणाले. पश्चिम किनारपट्टीवर वादळाचा धोका आहे, यासाठी यंत्रणा सज्ज आहे, पण मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
गरज नसताना घराबाहेर पडू नका. मधुमेह, हृदयविकार आणि उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांनी आणि वृद्धांनी घराबाहेर पडू नये. बाहेरून येणाऱ्यांनी घरातल्या वृद्धांना अनावधानानंही आपण कोरोना तर देत नाही ना, याची काळजी घ्यायला पाहिजे. बाहेरून आल्यानंतर घरातल्या वृद्धांजवळ जाताना स्वच्छ होऊन जा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
८ जूनपासून आपण १० टक्के उपस्थितीने आपण कार्यालयं आणि मंत्रालय सुरू करणार आहोत. १० टक्के उपस्थितीमध्ये काय परिस्थिती निर्माण होतेय, ते पाहून ही उपस्थिती वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, राष्ट्रपती राजवट लावा आणि लष्कराला बोलवा म्हणणाऱ्यांना आकडेवारी दाखवा, कारण ६५ हजारातले २८ हजार रुग्ण घरी गेले, बहुतेक जणांचा कोरोना मध्यम स्वरुपाचा आहे. तर व्हॅन्टिलेटरवर असेलेले काही रुग्णही बरे झाले आहेत. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान काही आपलीच लोकं करत आहेत, त्यामुळे दु:ख होतं. महाराष्ट्रात भयावह स्थिती नाही. दुर्दैवानं आपलीच लोकं कारस्थान करतात,
अशी टीका मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
वृत्तपत्रांचं वितरण पुढच्या सोमवारपासून प्रत्येकाच्या घरी होणार आहे, तसंच सकाळी ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत नागरिकांना वॉक करता येणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. वॉकला जाताना आपण आरोग्य कमावण्यासाठी जातोय, त्यामुळे गर्दी करू नका आणि नियम पाळा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनाही धन्यवाद दिले. मागच्यावेळी बोललो तेव्हा पियुष गोयल यांनी मनाला लावून घेतलं, पण त्यानंतर मजुरांना सोडण्यासाठी त्यांनी रेल्वे उपलब्ध केल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.