महिलांवरील अत्याचारावर तात्काळ कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्यात महिला सुरक्षिततेला प्राधान्य देण्याबरोबरच  महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याबाबत सक्त आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत.  

Updated: Dec 10, 2019, 04:37 PM IST
महिलांवरील अत्याचारावर तात्काळ कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश title=
Pic Courtesy: ANI

मुंबई : राज्यात महिला सुरक्षिततेला प्राधान्य देण्याबरोबरच  महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याबाबत सक्त आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिलेत. मुख्यमंत्री  ठाकरे यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबतची बैठक झाली. बैठकीत तब्बल एक तास सुरु चर्चा सुरु होती. यावेळी राज्यातल्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला गेला. यावेळी निर्भया फंडाच्या त्वरित विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा, असेही बजावले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. महिलांवरील अत्याचारुबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावीत. जेणेकरुन महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ आणि जलद कार्यवाही करून गुन्हेगारांना वचक बसेल, असे काम करा, असे मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.

सर्वसामान्य नागरिकाला पोलीसांविषयी आदर आणि त्याचबरोबर दरारा वाटेल अशा पद्धतीने काम करा. काही वेळा न्याय्य मागण्यांसाठी सर्वसामान्य नागरिक अहिंसात्मक मार्गाने रस्त्यावर उतरतात. अशा वेळी नोंदविण्यात आलेले गंभीर गुन्हे वगळता साध्या स्वरुपाचे गुन्हे काढून घेण्यासाठी सकारात्मक पावले टाकावित. अतिशय आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर केला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले. त्याचेवळी पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत. त्याला तात्काळ मान्यता देण्यात येईल. पोलिसांच्या घरांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, कर्तव्यकालावधीचे प्रश्न, कर्तव्य सहजतेने पार पाडता येतील, असे ते म्हणालेत.

दरम्यान, निर्भया फंडाच्या विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करण्यात यावी. गेल्या शासनाच्या कालावधीत निर्भया फंडमधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. हा निधी तात्काळ कशा पद्धतीने वापरता येईल. त्याबाबत त्याचा त्वरित विनियोग करता येईल, याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्यात.