मुंबई: अनेक नामवंत क्रिकेटपटू घडवणारे ज्येष्ठ प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का होऊ शकले नाहीत, याचे चीड आणणारे कारण अखेर समोर आले आहे. सरकारी खात्यांमधील अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी (कम्युनिकेशन गॅप) ही वेळ ओढावली, अशी धक्कादायक कबुली गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून प्रकाश मेहता आचरेकर यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांनी आचरेकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का झाले नाहीत, असा प्रश्न त्यांना विचारला. यावर प्रकाश मेहता यांनी दिलेल्या उत्तरामुळे सरकारचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला. प्रकाश मेहता यांनी म्हटले की, आचरेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले नाहीत, ही अत्यंत दु:खाची व दुर्दैवी गोष्ट आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे योग्यप्रकारे समन्वय होऊ शकला नाही. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी याबद्दल माफी मागतो. मी नक्की या सर्व प्रकाराची माहिती घेईन, असे मेहता यांनी पत्रकारांना सांगितले.
मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो. तेव्हा त्यांनी आम्हाला शिष्टाचार विभागाकडून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याबद्दल कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले.
साधारणत: अशावेळी सामान्य प्रशासन विभागाकडून मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला जातो. यानंतर मुख्यमंत्री त्या प्रस्तावाला मंजूरी देतात. मात्र, यावेळी आम्हाला काहीच कळवण्यात आले नव्हते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
विनोद तावडेंचं स्पष्टीकरण
दरम्यान, पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्यानं क्रिकेट विश्वातून आणि क्रिकेट चाहत्यांमधून नाराजी व्यक्त होतेय. यावर, भाजप नेते आणि राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिलीय. 'आचरेकर सरांच्या अंत्यसंस्काराला शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंत्री उपस्थित होते... एमसीएचे अध्यक्ष म्हणून आशिष शेलारही उपस्थित होते... अंत्यसंस्कारात सर्व गोष्टी प्रोटोकॉलप्रमाणे झाल्या आहेत. आचरेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लवकरच क्रीडा विभाग आणि शासन काही अभिनव उपक्रम राज्यात सुरू करेल' असं विनोद तावडे यांनी म्हटलंय.