मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. नवी मुंबईत एका कार्यक्रमाला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी 'मला असं वाटतं की मी आजही मुख्यमंत्रीच आहे' असं विधान केलं आहे. तुमच्या सारखे नेते पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवला नाही की मी मुख्यमंत्री नाही, मला असं वाटतं की मी आजही मुख्यमंत्रीच आहे, असं म्हटलं होत. फडणवीस यांच्या वक्तव्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जोरदार टोला लगावला आहे.
महाविकास आघाडी सरकारला आता जवळपास दोन वर्ष होतील, मला वाटतं की त्या मानसिकतेतून देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ला बाहेर काढलं पाहिजे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे. विरोधी पक्ष नेतेपद हे मुख्यमंत्री पदापेक्षा कमी नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेतून आतातरी बाहेर पडा, विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत या, त्या माध्यमातूनही जनतेची सेवा करता येते, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिला आहे.
तर देवेंद्र फडणवीस अजूनही स्वप्नातून बाहेर यायला तयार नाहीत. आता ते मुख्यमंत्री नाहीत हे मानायला तयार नाहीत असा टोला काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लगावला आहे. आता मुख्यमंत्री नव्हे तर विरोधी पक्षनेते आहेत. सकाळचा प्रयोगही फसला आहे. त्यानंतर ज्योतिषांकडून अनेक तारखा घेऊनही शपथ घेता आलेली नाही. तरी साहेबांचे मी पुन्हा येईन, पुन्हा येईन सुरुच आहे. त्यांना आताही मीच मुख्यमंत्री आहे असं वाटणं हास्यास्पद आहे, असं अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.
कल्पनेतही नसताना मविआ सरकार स्थापन झाले हा झटका मोठा होता याची जाणीव आहे. मानसिक धक्क्यातून अनेकदा अशा प्रकारची लक्षणं उद्भवू शकतात, असा चिमटा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना काढला आहे. रक्तात मीठाचे प्रमाण कमी झाले तरी असे भ्रम होतात म्हणे! लवकरात लवकर डॉक्टरला दाखवणे गरजेचे आहे, आधीच दोन वर्ष अंगावर काढली आहेत काळजी घ्यावी, असा उपरोधिक सल्ला सचिन सावंत यांनी दिला आहे.