विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता

राज्यात विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस संकटात

Updated: Jun 4, 2019, 04:53 PM IST
विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आता काँग्रेसला राज्यात मोठी खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसपासून अधिकृत फारकत घेतली. यावेळी काँग्रेसच्या सहा आमदारांनी विखे यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे.

काँग्रेसचे ८ ते १० आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. लोकसभेतील पराभवाने खचलेल्या काँग्रेसला लवकरच मोठा धक्का बसणार असल्याचं दिसतं आहे. विखे-पाटील यांच्या संपर्कात अनेक काँग्रेसचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्कातून काँग्रेस अजून सावरलेली नसताना आता काँग्रेसला राज्यात आणखी काही धक्के बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये भविष्य नसल्याचे लक्षात आल्याने पक्षाचे काही आमदार आता विखे-पाटील म्हणजेच भाजपच्या संपर्कात आहेत. 

आतापर्यंत १. अब्दुल सत्तार, सिल्लोड - औरंगाबाद, २. जयकुमार गोरे, माण - सातारा, ३. भारत भालके, पंढरपूर, ४. गोपालदास अग्रवाल, गोंदिया, ५ सुनील केंदार, सावनेर- नागपूर, ६. राहुल बोंद्रे, चिखली, बुलढाणा या आमदारांनी विखे पाटील यांची भेट घेतली आहे. 

आज विखे-पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि काँग्रेसपासून पूर्ण फारकत घेतली. त्यापूर्वी त्यांच्या घरी पार पडलेल्या बैठकीला काँग्रेसचे काही आमदार उपस्थित होते. १० आमदारांचा गट विखेंबरोबर असल्याचा दावा यावेळी काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा भाजपा प्रवेश कधी होणार आणि त्यांचा मंत्रीमंडळात समावेश कधी होणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. विखेंनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचीही भेट घेतली. काँग्रेसमध्ये घडणाऱ्या हा हालचालींबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून या नेत्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.

सचिन सावंत यांनी ट्विट करुन म्हटलं की, 'पक्षाने प्रचंड दिल्यानंतरही पक्ष सोडणारे काही नेते आमदार फोडून पक्ष तोडण्याची भाषा करत आहेत. ही त्यांची मनोवृत्ती दर्शविते. 134 वर्षांची काँग्रेस पराभवाने संपणार नाही. पुन्हा नव्या ऊर्जेने, ताकदीने उभारी घेईल. गद्दारी केली तरी त्यांना शुभेच्छा. शेवटी काँग्रेस महात्मा गांधींची आहे.'

राज्यात तीन महिन्यांवर विधानसभेची निवडणूक असताना काँग्रेसमध्ये घडणाऱ्या या घडामोडी काँग्रेसची डोकेदुखी वाढवणाऱ्या आहेत. एकीकडे लोकसभा निवडणुकीतील पराभवातून सावरण्याचं आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचं आव्हान काँग्रेस समोर आहे. तर दुसरीकडे पक्षातील बंडखोर आमदारांना थोपवण्याबरोबरच, जाणाऱ्या आमदारांच्या जागी सक्षम उमेदवार उभे करण्याचंही आव्हान आहे. त्यामुळेच येणारा काळ काँग्रेससाठी अत्यंत कसोटीचा आहे.