'MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी निवडणूक आयोगाला पत्र'; CM शिंदेंचं विधान ऐकून NCP, Congress ने उडवली खिल्ली

Congress NCP Slams CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल प्रतिक्रिया नोंदवली. मात्र ही प्रतिक्रिया नोंदवताना त्यांच्याकडून एक मोठी चूक झाली.

Updated: Feb 22, 2023, 04:22 PM IST
'MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी निवडणूक आयोगाला पत्र'; CM शिंदेंचं विधान ऐकून NCP, Congress ने उडवली खिल्ली title=
CM Eknath Shinde

CM Eknath Shinde on MPSC Students: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 2025 सालातील परीक्षा नव्या अभ्यासक्रमानुसार घ्यावी अशी मागणी करत मागील दोन दिवसांपासून पुण्यात एमपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळातही रंगू लागली असतानाच काल रात्री 11 च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी पवार यांनी या विषयात लक्ष घालून नक्की हा प्रश्न सोडवू असं सांगितलं. याच आंदोलनासंदर्भात आज मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळेस सरकार हे विद्यार्थ्यांबरोबर असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं. मात्र पत्रकारांना प्रतिक्रिया देताना एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठीचं पत्र केंद्रीय लोकसेवा आयोगाला अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगा पाठवलं असं म्हणण्याऐवजी मुख्यमंत्री शिंदेंनी चुकून निवडणूक आयोगाला पत्र पाठवल्याचं सांगितलं. बोलताना मुख्यमंत्र्यांकडून चुकून निवडणूक आयोगाला उल्लेख झाला. बरं हा उल्लेख एकदा नाही तर 3 वेळा झाला. त्यामुळेच आता हा व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे.  

शिंदे नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्री शिंदेंना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी एमपीएससी विद्यार्थ्यांबद्दलचा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदेंनी, "एमपीएसीच्या विद्यार्थ्यांबरोबर मी काल स्वत: फोनवर बोललो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही बोलेले आहेत. त्यामुळे जी भूमिका एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे तीच सरकारची भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेशी सरकार सहमत आहे. नवी पद्धत 2025 पासून लागू करण्याची जी मागणी आहे त्याबद्दल आम्ही  निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे. निवडणूक आयोगाकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे," असं शिंदे म्हणाले. या ठिकाणी शिंदेंना केंद्रीय लोकसेवा आयोगाला किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र पाठवलं आहे असं म्हणायचं होतं पण त्यांनी चुकून निवडणूक आयोग असा उल्लेख केला. 

शिंदे यांनी पुढे बोलताना, "कालही त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. सरकार एमपीएसच्या विद्यार्थ्यांच्या मताशी सहमत आहे. 2025 पासून नव्या अभ्यासक्रमाप्रमाणे परीक्षा व्हावी या विद्यार्थ्यांच्या मताशी सरकार सहमत आहे. म्हणून निवडणूक आयोगानेही तशाप्रकारचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे," असं म्हटलं. या ठिकाणीही त्यांनी निवडणूक आयोग असाच उल्लेख केला. 

राष्ट्रवादीचा टोला...

याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादीने मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष्य केलं आहे. शिंदेंचा हा व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादीने, "यांना उठता, बसता, खाता, पिता, झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच दिसतो वाटतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, यातच सगळे आले," असा टोला लगावला आहे. 

काँग्रेचाही शाब्दिक चिमटा...

"मुख्यमंत्री शिंदेंना नक्की झालंय काय? असा प्रश्न शिंदेंचा हा व्हिडीओ पोस्ट करत विचारला आहे. एमपीएससीची नवीन परीक्षा पद्धत 2025 पासून लागू व्हावी यासाठी निवडणूक आयोगाला पत्र देतात? मुख्यमंत्री शुद्धीत आहेत का?" असा प्रश्न काँग्रेसने विचारला आहे.

सध्या सोशल मीडियावरही हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या चुकीच्या शब्द वापरावरुन त्यांना लक्ष्य केलं आहे.