'नाना पटोले किती बैठकीला होते तपासा'; मविआच्या जागावाटपावर वर्षा गायकवाड नाराजी

Varsha Gaikwad News: महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागावाटपावर काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जो जिंकणार आहे त्याला तिकीट द्यायला हवं होतं असं वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

आकाश नेटके | Updated: Apr 11, 2024, 02:41 PM IST
'नाना पटोले किती बैठकीला होते तपासा'; मविआच्या जागावाटपावर वर्षा गायकवाड नाराजी title=

Varsha Gaikwad: राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर गुढीपाढव्याच्या दिवशी जाहीर करण्यात आला. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांनी लोकसभेच्या 48 जागांची विभागणी जाहीर केली. मात्र प्रत्यक्षात ज्या जागांवर काँग्रेस निवडणूक लढवत होती, त्या जागांवर ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केले आहेत. दुसरीकडे मुंबईतील उत्तर पश्चिम आणि दक्षिण मध्य मतदारसंघावरुन काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

"प्रत्येक पक्षात प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्याला जागा मिळावी. बरोबरीच्या जागा मिळाव्यात अशी आमची मागणी होती. आम्ही जिथे लढायचो त्या जागा मिळाव्यात अशी मागणी होती. मी पक्षश्रेष्ठींना याबाबत नाराजी कळवली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीच्या नेत्यांना मी सांगितलं होतं. त्यामुळे पक्षाला कमीतकमी तीन जागा मिळण्याची इच्छा होती. मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ कार्यकरता आहे. पण पक्ष संघटनेत कार्यकर्त्यांकडून काही अपेक्षा असतात. आम्ही अनेक वेळा या गोष्टी बोललो आहोत पण शेवटी पक्षाची शिस्त मी मानते. आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहोत," असे वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

"खूप चर्चानंतर हे निर्णय झाले आहेत. प्रत्येकाला लढण्याची इच्छा आहे. पक्षाचे काही निर्णय स्वीकारावे लागतात. पक्षश्रेष्टी आणि ठाकरेंनी काही निर्णय घेतला तर आम्ही त्याचे स्वागत करु, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या. नाना पटोले किती बैठकीला उपस्थिती होते ते ही तपासावं. भिवंडी, सांगली, उत्तर पश्चिमबाबत आम्ही आमचं म्हणणं सांगितलं होतं. पण ज्या गोष्टी झाल्या त्याच्याबद्दल बोलणं योग्य नाही," असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

"हे नाराजी नाट्य नाही ही आमची भूमिका आहे. आम्ही आमच्या पक्षाला काही भूमिका असेल तर ती सांगतो. महायुतीत आज काय गत आहे हे दिसत आहे.  त्यांनी स्वतःकडे पाहावं आधी. तसेच जो पक्ष निर्णय घेणार तो आम्ही स्वीकारु. आता पक्षाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही काम करु. आता पुढे गेलं पाहिजे आणि मी ही पुढे गेली आहे," असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.