मुंबई : देशाभरात हनुमान जयंतीचा माहोल आहे. हनुमान जयंतीनिमित्ताने देशात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात जंयती साजरी केली जात आहे. मात्र या हनुमान जयंतीला गाळबोट लागलं आहे. दिल्लीत जहांगिरपुरी शोभायात्रेवर दगडफेक झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यात अलर्ट जारी करण्यात आली आहे. (controversy hanuman jayanti in jahanhgirpuri at delhi high alert in maharashtra)
शोभायात्रेवर झालेल्या या हल्ल्यात अनेक लोकांसह अनेक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याची माहिती येत आहे. अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. जहांगीरपुरी या ठिकाणी ही घटना घडली आहे.
हनुमान जयंतीनिमित्त मिरवणूक काढली जात असताना हा हिंसाचार सुरू झाला आणि बघता बघता अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही हल्ला करण्यात आला.
सध्या येथे तणावाचे वातावरण असून, जे व्हिडिओ समोर आले आहेत त्यात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. मिरवणुकीवर दगडफेक केल्याचेही सांगण्यात आले. यावेळी पोलिसांकडून या घटनेवर काहीही बोलण्याचे टाळले जात आहे.
दिल्लीतील या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत राज्य शासन अलर्ट झालंय. कोणताही पेचप्रसंग निर्माण होऊ नये, यासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.