मुंबई : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची पावलं उचलली आहेत. विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंनी याबाबतची घोषणा केली आहे. चीन, दक्षिण कोरिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि इराण या ७ देशांना भेट दिली असेल आणि आज संध्याकाळी ५:३० नंतर देशात विमानाने येतील त्यांना स्थानबद्ध करण्यात येईल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमधल्या जीम, स्विमिंग पूल, थिएटर आज रात्री १२ वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या शाळा बंद राहणार आहेत, पण इतर शहरांमधल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधल्या शाळा पुढील सूचना येईपर्यंत बंद राहतील. शहरांमधले मॉल सुरु राहणार, पण तिकडे गर्दी करु नये, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.
नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसंच हॉटेलमध्ये जाणंही टाळावं. शक्य असेल तिकडे खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमला परवानगी द्यावी, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे. धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमांना परवानगी दिली असेल, तर ती रद्द करावी, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकर घ्या किंवा उशीरा घ्या, असं आवाहन विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. पण परीक्षा उशीरा घेण्यात येतील, कारण पुढचे १५ दिवस महत्त्वाचे आहेत, असं उद्धव ठाकरे विधानसभेत म्हणाले.
राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या १७ वर गेली आहे. पुण्यामध्ये कोरोनाचे १० रुग्ण आढळले आहेत, तर नागपूरमध्ये आणखी २ रुग्ण सापडले आहेत.