कोरोना : मीरा रोड येथे औषधांचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

 कोरोनासारख्या महामारीत आता औषधांचाही काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे.  

Updated: Jul 11, 2020, 02:22 PM IST
कोरोना : मीरा रोड येथे औषधांचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

मुंबई : कोरोनासारख्या महामारीत आता औषधांचाही काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे. मीरा रोड येथून कोविडची रोगप्रतिकारक क्षमता वाढविणाऱ्या रेमडीसीवीर या इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

कोविडची रोगप्रतिकारक क्षमता वाढविणाऱ्या रेमडीसीवीर या इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री करणारे सोनी दर्शी आणि रॉड्रिंक्स टोनिराळ अशी दोघांची नावे आहेत.  बाजारात या इंजेक्शनची कमतरता लक्षात घेऊन या दोघांनी साडेपाच हजाराला मिळणाऱ्या इंजेक्शन २५ ते ३० हजार तसेच गिऱ्हाईक मिळेल तश्या चढ्या भावाने विक्री केली जाणार होती.

 मात्र याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांना मिळाल्यानंतर त्यांनी दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, कोविडवरील उपचारासाठी वापरण्यात येणार्‍या इंजेक्शन्सचा काळाबाजार केला तर कडक कारवाई होणार आहे. अशाप्रकारे औषधांचा काळा बाजार आढळून आला तर पोलीस आणि एफडीए संयुक्त कारवाई करणार आहे. औषधांचा काळाबाजार होत असल्याचं आढळल्यास टोल फ्री क्रमांक - 1800222365 तक्रार करता येईल.

दोन दिवसांपूर्वी मुंबईत औषध दुकानांवर अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी अचानक धाड टाकून पाहणी केली होती.