मुंबई: मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि चाकरमनी आणि कामावर जाणाऱ्या प्रत्येकासाठी हक्काची असणारी मुंबईची लाइफलाइन लोकल कधी सुरू होणार असा सर्वांनाच प्रश्न आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून लोकलवर निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना लोकलनं प्रवास करण्याची मुभा सध्या तरी नाही.
लोकलनं सर्वसामन्य नागरिकांना प्रवास कधी करता येणार? असा एकच प्रश्न मुंबईकर विचारत आहेत. तर यासंदर्भात पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठी माहिती दिल्यानं नागरिकांची निराशा झाली आहे.
कोरोना संपल्याशिवाय मुंबईतील लोकल सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरु होणार नाही अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी नागपूरात दिली. एकीकडे मुंबईतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानं लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं होतं. मात्र वडेट्टिवांच्या विधानामुळे मुंबईकरांचा हिरमोड झाला.
देशात काल दिवसभरात कोरोनाचे 53 हजार 256 नवे रुग्ण आढळून आले आहे. गेल्या 88 दिवसांतली ही सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे. काल 78 हजार 190 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर कोरोनामुळे 24 तासांत 1 हजार 422 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशातील अॅक्टव्ह रुग्णांची संख्या 7 लाख 2 हजार 887 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.