विधान परिषदेच्या सहा जागांसाठी आज मतमोजणी

विधानपरिषदच्या सहा जागांसाठीची मतमोजणी आज होत आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: May 24, 2018, 07:25 AM IST
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी आज मतमोजणी title=

मुंबई : विधानपरिषदच्या सहा जागांसाठीची मतमोजणी आज होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेतून कोणत्या पक्षाचे उमेदवार निवडून येतात याकडे लक्ष लागले आहे. यापैकी बीड-लातूर-उस्मानाबाद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेची मतमोजणी काही काळाकरता पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड, परभणी-हिंगोली, वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली तसंच नाशिक आणि अमरावती अशा पाच जागांचे निकाल लागणार आहेत.

या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ३ - ३ जागांवर आघाडी केली आहे. तर एकमेकांच्या विरोधात उमेदवार न देता शिवसेना-भाजप यांनी ३-३ जागांवर आघोषित अशी युती केली होती. मात्र पालघर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शेवटच्या क्षणी भाजपाने नाशिक आणि कोकणमध्ये शिवसेना विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नाशिक आणि कोकणात काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. 

कोकणात तर या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचे पुत्रे अनिकेत तटकरे यांचा विधानपरिषदमध्ये प्रवेश होतो का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.  सध्या विधानपरिषदमध्ये राष्ट्रवादीचे २३, काँग्रेसचे १९, भाजपाचे १८, शिवसेनेचे ९, शेकाप एक, जनता दल युनायटेड एक, पीपल्स रिपबल्किन पार्टी एक आणि सहा अपक्ष अशी स्थिती आहे.  

या निवडणुकीची सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता विधानपरिषदमधील पक्षीय बलाबलमध्ये फारसा फरक पडणार नाही.  असं असलं तरी येत्या जून - जुलै महिन्यात १० पेक्षा जास्त सदस्यांचा कार्यकाल संपत असल्यानं विधानपरिषदमध्ये पक्षीय ताकदीमध्ये मोठा फरक पडणार आहे.