Mumbai Dahi Handi 2024: सणाला गालबोट! दहीहंडीत 41 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

Dahi Handi 2024 Celebration in Mumbai : जन्माष्टमीनंतर दहीहंडीचा सगळीकडे वेगळाच जल्लोष पाहायला मिळत आहे. असं असताना मुंबईत एक अनोखा उत्साह पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मुंबईत तब्बल 41 गोविंदा जखमी झाले आहेत. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 27, 2024, 04:54 PM IST
Mumbai Dahi Handi 2024: सणाला गालबोट! दहीहंडीत 41 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु  title=

Dahi Handi 2024 Celebration in Mumbai : मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. असं असताना मुंबईसह ठाणे परिसरात दहीहंडीचा जल्लोष सर्वाधिक असतो. याठिकाणी वेगवेगळ्या राजकीय मंडळींनी दहीहंडीचं आयोजन केलं आहे. येथे लाखो रुपयांचे बक्षिस दहीहंडीला दिले जातात. अनेक गोविंदा पथक या ठिकाणच्या दहीहंडींना भेट देतात. 

आज मुंबईसह ठाण्यात पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे. पावसामुळे गोविंदाचा उत्साह देखील शिगेला पोहोचला आहे. सकाळपासून मुंबईतील गोविंदा पथक वेगवेगळ्या दहीहंडी फोडत आहे. दहीहंडी फोडताना 41 गोविंदा जखमी झाले आहे. या गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या मध्ये 8 गोविंदाना रुग्णालयात दाखल केलं आहे. 26 गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार सुरु आहेत तर 7 गोविंदांना उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

रुग्णालयाचे नाव आणि जखमी गोविंदांची माहिती 

  • सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये 2 जखमी गोविंदांची नोंद. एक रुग्णालयात दाखल असून एकावर उपचार सुरु 
  • जीटी हॉस्पिटलमध्ये एक गोविंदा जखमी 
  • पोद्दार हॉस्पिटलमध्ये 6 गोविंदा जखमी. उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला. 
  • केईएम हॉस्पिटलमध्ये 8 जखमी गोविंदाना दाखल करण्यात आलं होतं. एका गोविंदाला रुग्णालयात दाखल केलं असून 7 रुग्णांना उपचार करुन सोडण्यात आलं. 
  • नायर हॉस्पिटलमध्ये 5 जखमी गोविंदावर उपचार करण्यात आले. 
  • सायन रुग्णालयात 3 जखमी गोविंदावर उपचार सुरु 
  • राजावाडी हॉस्पिटलमध्ये 3 गोविंदा जखमी दाखल 
  • एमटी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये 1 जखमी गोविंदा दाखल
  • कुर्ला भाभा हॉस्पिटलमध्ये दोन गोविंदा जखमी झाले आहेत. 
  • शताब्दी गोविंद हॉस्पिटलमध्ये 2 गोविंदा जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु होते. 
  • वांद्रे भाभा हॉस्पिटलमध्ये 3 जखमी गोविंदांवर उपचार सुरु आहेत.