मुंबई: राज्यात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर झाला नाही तर शिवसेना सरकारविरोधात रस्त्यावर उतरेल, अशा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. ते गुरुवारी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दुष्काळाच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरले.
हवामान खात्याने पावसाचा वर्तवलेला अंदाज साफ चुकलेला आहे. त्यामुळे मराठवाड्याचा परिसराला दुष्काळाच्या झळा बसायला लागल्या आहेत. याठिकाणी पाणी आणि चाऱ्याचा तुटवडा स्पष्टपणे जाणवत आहे. मात्र, तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहवाल आणि पाहण्यांमध्ये गुंतले आहेत. याउलट शेजारील कर्नाटकने जुन्या निकषांवरच दुष्काळ जाहीर केला. केंद्रात भाजपची सत्ता असताना फडणवीस यांना ही गोष्ट का जमत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
मराठवाड्यातील अनेक परिसरात पाणी आणि चारा नसल्यामुळे लोक स्थलांतर करत आहेत. हे स्पष्टपणे दिसत असताना सरकार आणखी किती दिवस वाट पाहणार?
भाजपला फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत. अगदी गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकीतही मुख्यमंत्री हस्तक्षेप करतात. भाजपला सगळीकडे सत्ता हवी. हा सगळा कारभार पाहिल्यानंतर सरकारच्या आरत्या ओवाळायच्या का, असा खरमरीत सवालही उद्धव यांनी विचारला.