आज दाऊदच्या मुंबईतील मालमत्तेचा लिलाव

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमविरोधात तपास यंत्रणांकडून फास आवळला जात असतानाच आता केंद्र सरकारच्या महसूल विभागानेही देखील दाऊद विरोधात मोहिम उघडलीय.

Updated: Nov 14, 2017, 08:26 AM IST
आज दाऊदच्या मुंबईतील मालमत्तेचा लिलाव title=

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमविरोधात तपास यंत्रणांकडून फास आवळला जात असतानाच आता केंद्र सरकारच्या महसूल विभागानेही देखील दाऊद विरोधात मोहिम उघडलीय. दाऊदच्या दक्षिण मुंबईतील संपत्तीचा लिलाव करण्यास महसूल विभागाने सुरुवात केलीय. त्याचाच एक भाग म्हणून महसूल विभागाने दाऊदच्या मुंबईतील संपत्तीचा आज (मंगळवारी) जाहीर लिलाव ठेवलाय. त्याच्यासाठी हा मोठा दणका मानला जात आहे.

मुंबईत चर्चगेट इथल्या इंडियन मर्चंट चेंबर्सच्या इमारतीमध्ये हा लिलाव पार पडेल. एकाच वेळी अनेक ठिकाणांवरुन जागांचा जाहीर लिलाव, ई-लिलाव आणि त्यासोबतच बंद लिफाफ्यात लावण्यात आलेली बोली जाहीर करण्यात येईल. महसूल विभागाने प्रत्येक मालमत्तेसाठी एक आधारभूत किंमत ठरवलीय. सगळ्यात मोठी बोली लावणा-या व्यक्तीच्या नावावर ही मालमत्ता करण्यात येईल. याआधी मुंबईमधील दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात आला होता. आता या मालमत्तेची खरेदी कोण करणार आणि त्यावर किती बोली लागणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

१९९३ च्या मुंबई साखळी स्फोटातील दाऊद हा मुख्य आरोपी असून या स्फोटांनंतर तो पाकिस्तानात लपून बसलाय. या स्फोटात तब्बल २५७ जणांचा मृत्यू झाला होता तर ७०० हुन आधी नागरिक जखमी झाले होते.