OBC आरक्षणावर आक्रमक भूमिका घेताना फडणवीसांनी करुन टाकली मोठी घोषणा

राज्य सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला आहे. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवण्याची मागणी ही सरकारकडून मान्य करण्यात आलेली नाही अशी टीका ही त्यांनी केली.

Updated: Jun 23, 2021, 05:16 PM IST
OBC आरक्षणावर आक्रमक भूमिका घेताना फडणवीसांनी करुन टाकली मोठी घोषणा title=

मुंबई : OBC आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशी भूमिका आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी मांडली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जोपर्यंत ओबीसीना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा आमचा लढा सुरू राहणार असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

ओबीसींचा विश्वासघात राज्य सरकारने केला आहे. ज्या निवडणुका जाहीर केल्या आहेत त्या पुढे ढकलाव्यात अशी विनंती आम्ही राज्यपाल यांच्याकडे केली आहे. एकीकडे कोरोना आहे असं राज्य सरकार म्हणत आहे आणि यासाठी अधिवेशन दोन दिवसांचे करत आहे. तर दुसरीकडे निवडणुका जाहीर केल्या जात आहे, मग तिकडे कोरोना पसरणार नाही का ? 

आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. अशी मागणी त्यांनी केली आहे. तरी निवडणुका घेतल्या तर सर्व जागांवर ओबीसी उमेदवार देणार. अशी घोषणा फडणवीसांनी केली आहे.

'सरकारमधील आमदार नाराज आहेत. मंत्री मस्त आणि आमदार पस्त अशी स्थिती आहे. राज्यात शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाही. दुधाला भाव नाही. आमच्या काळात दुधाचा भाव २५ रुपये केला होता. आता शेतकऱ्याला १६ रुपये मिळतात.'

'शेतकऱ्यांच्या विजेचे कनेक्शन कापवण्याचं पाप या सरकारने केलं आहे. ओबीसी आणि मराठा समाजाने मागणी केली होती आरक्षणाच्या मुद्द्यावर २ दिवसाचं अधिवेशन बोलवावं. पण सरकारने तसं केलं नाही.' असं ही फडणवीसांनी म्हटलं आहे.

उद्याच्या पक्ष कार्यकारिणीत पूढील आंदोलने आणि संघटनात्मक कार्यक्रम यावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री कार्यालय लक्ष ठेवणार असेल तर ते चांगलेच आहे, खरच जर असं करणार असतील तर त्याचे मी स्वागत करतो, कारण ह्यांनी लक्ष ठेवलं नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीचे मंत्री काय काय करतील हे आम्हालाच उघड करावं लागेल. असं ही फडणवीसांनी म्हटलं आहे.