महापुरुष हे वंदनीयच, शपथेच्या मुद्दयाला वेगळं रुप दिलं गेलं - देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली. 

Bollywood Life | Updated: Dec 1, 2019, 07:26 PM IST
महापुरुष हे वंदनीयच, शपथेच्या मुद्दयाला वेगळं रुप दिलं गेलं - देवेंद्र फडणवीस title=

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची आज विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर पक्षाच्या गटनेत्यांची त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानले.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, 'राज्यातील महत्त्वाच्या पदावर माझी निवड केल्याने मी सर्वांचे आभार मानतो. सर्व सन्माननीय सदस्यांचे मी आभार मानतो. काल या सभागृहात विरोधीपक्षात आम्ही सगळे एकत्र आलो. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा देता आल्या नाहीत. आज विरोधीपक्ष नेता म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. संबंध हे राजकारणाच्या पलीकडे असतात. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा देतो. त्यांच्या मनात जनतेसाठी त्यांनी ज्या योजना तयार केल्या आहेत. अशा चांगल्या गोष्टींचं आम्ही समर्थन करु.'

'विरोधीपक्षात काम करणं आमच्यासाठी सहज आहे. आमचं डीएनए तेच आहे. मी कधीही नियमाच्या बाहेर गेलो नाही. संविधानाला धरुनच मुद्दे मांडत होते. नियमानुसार मुद्दे मांडले. पण अध्यक्षांचा निर्णय़ अंतिम असतो. पण त्यांच्या निर्णयावर समाधानी नव्हतो. म्हणून आम्ही बर्हिगमन केलं. संविधानाच्या पलीकडे मी कोणताही मुद्दा मी मांडणार नाही.'

'शपथेचा मुद्दा मांडला त्याला वेगळं रुप दिलं गेलं. छत्रपती शिवाजींचं नाव घेऊनच आम्ही आलो. आमचं अराध्य दैवत तेच आहेत. आम्ही कधीही राजे झालो नाहीत. काल ही सेवक होतो आजही सेवक आहोत. हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्या. सकाळी घ्या, झोपण्यापूर्वी घ्या, दिवसातून २५ वेळा घ्या हे सगळे वंदनीयच आहेत. पण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या अनुसुचीमध्ये शपथ कशी घेतली पाहिजे. याबाबत प्रफोर्मा दिला आहे. त्याचं पालन केलं तरच आंबेडकरांचा नाव घेण्याचा अधिकार आपल्याला आहे. भविष्यात ही हे झालं पाहिजे. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्य़क्ष बराक ओबामा यांना २ शब्द चुकल्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा शपथ घ्यावी लागली होती.'

'सभागृहात २० वर्ष काम करण्याची संधी मिळाली. बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानात इतकी शक्ती आहे. लोकशाहीने मोठी प्रचंड ताकद दिली आहे. विरोधीपक्ष तुम्ही असाल कधी आम्ही असू. पण विरोधीपक्ष म्हणजे शत्रू नाहीत. ७० टक्के जागा मिळवूनही आम्ही मेरिटमध्ये आलो नाही. पण ४० टक्के मिळाल्य़ानी एकत्र येत सत्ता मिळवली.'