स्टिकर छापण्यात वेळ गेल्यामुळेच पूरग्रस्तांना उशीरा मदत मिळाली- धनंजय मुंडे

शोबाजीपायी लोकांना उपाशी माराल.

Updated: Aug 10, 2019, 03:36 PM IST
स्टिकर छापण्यात वेळ गेल्यामुळेच पूरग्रस्तांना उशीरा मदत मिळाली- धनंजय मुंडे title=

मुंबई: पुराचा वेढा पडलेल्या कोल्हापूर आणि सांगलीतील नागरिकांना देण्यात आलेल्या मदत साहित्यावर भाजपचे स्टिकर लावल्यामुळे सरकार अडचणीत सापडले आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. सरकारने स्टिकर छापण्यात वेळ वाया घालवल्यानेच पूरग्रस्तांना दोन दिवस उशीरा रसद मिळाली, असा आरोपही त्यांनी केला. 

सरकारची प्राथमिकता नेमकी कशाला आहे? तर स्टिकर छापायला. स्टिकर छापण्यासाठी पूरग्रस्तांना तब्बल दोन दिवस मदत दिली नाही. लेकरं-बाळं उघड्यावर पडलीत. यांना मात्र स्वत:चे फोटो टाकत स्टीकर डिझाईन करून, प्रिंट करून ते चिटकवण्यात तत्परता दाखवायची आहे. शोबाजीपायी उपाशी माराल लोकांना, असे धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पूरात अडकलेल्या नागरिकांना सरकारी यंत्रणांकडून धान्य आणि पाणी पुरवले जात आहे. मात्र, कोल्हापूरमध्ये वाटण्यात आलेल्या धान्याच्या पिशव्यांवर स्वत:ची आणि पक्षाची जाहिरात करणारे स्टिकर्स लावण्याचा प्रताप आमदार सुरेश हळवणकर केला. हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात आला होता. 

यानंतर 'झी २४ तास'शी संवाद साधताना सुरशे हळवणकर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मदत म्हणून देण्यात आलेले धान्य मोफत आहे. दुकानांमध्ये ते पैसे देऊन विकले जाऊ नये, यासाठी धान्याच्या पिशव्यांवर स्टिकर लावण्यात आल्याचे हळवणकर यांनी सांगितले.