मुंबई : राज्यात महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिवाळीत फटाके वाजविण्यावर बंदी घातली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचवेळी दिवाळी साजरी करताना घ्यावयाची खबरदारी आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठीच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डेथ ऑडीट कमिटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे, राज्य साथरोग नियंत्रण कक्ष समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते.
राज्याचा मृत्यूदर कमी करण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. ज्या रुग्णालयांमध्ये मृत्यूदर अधिक आहे त्या ठिकाणी रुग्णालयस्तरावरच डेथ ऑडिटी कमिटी नेमून शासनाला अहवाल देण्याचे यावेळी तज्ज्ञांनी संगितले, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे नागरिकांना आवाहन केले. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून फिव्हर सर्व्हेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
— Rajesh Tope (@rajeshtope11) November 5, 2020
दरम्यान, मुंबईत यंदा दिवाळीत फटाके फोडण्यावर मुंबई महापालिकेचे निर्बंध घातले आहे. फटाके फोडण्यासंदर्भात मुंबई महापालिकेची एसओपी जारी होणार आहे. मरिन ड्राईव्ह, जुहू बीच, वरळी सीफेस सारख्या सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडता येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मर्यादित स्वरुपात आणि मर्यादित स्वरुपातच फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोसायटी आणि घराच्या आवारातच फटाके फोडता येतील. मात्र, सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडल्यास मुंबई महापालिकेकडून पोलिसांच्या मदतीने कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे नागरिकांना आवाहन केले. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून फिव्हर सर्व्हेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची आज बैठक घेतली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यात आला.
- कोरोना संदर्भात असलेल्या एसओपीचे पालन करण्यात यावे.
- दिवाळीत प्रदूषण होऊ नये म्हणून फटाके फोडणे टाळावे. दिव्यांची आरास करा आणि दिवाळी साजरी करा.
- दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन न करता ऑनलाइनवर भर द्यावा. सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे
- सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्था यांनी रक्तदान शिबीर, आरोग्य शिबिरांवर भर द्यावा.
- धार्मिक स्थळं अद्याप खुली केलेली नाही. त्यामुळे सण घरगुती पद्धतीने साजरा करावा