डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयातील धक्कादायक वास्तव

शास्त्री रुग्णालयात दररोज गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे.     

Updated: Jul 6, 2020, 08:41 AM IST
डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयातील धक्कादायक वास्तव title=

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परंतु रुग्णांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा अपुरी पडत असल्याचं धक्कादायक चित्र केडीएमसी शाश्त्रीनगर रुग्णालयात दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या दारातच रुग्णांवर उपचार केले जात आहेत. परिणामी शास्त्रीनगर रुग्णालयात बेड कमी पडत असल्यामुळे रुग्णांचे  हाल होत आहेत. रुग्णालयात 57 बेडचं कोविड सेंटर आहे मात्र ते पूर्ण भरलेलं आहे. त्यामुळे रुग्णालयात नवा रुग्ण दाखल होताच ज्या ठिकाणी जागा दिसेल त्याठिकाणी रुग्णांस ऑक्सिजन लावला जात आहे. 

महापालिकेच्या कामकाजावर आता भाजपने टीका केली आहे. 'कल्याण डोंबिवलीमध्ये रुग्णांची  संख्या वाढत आहे. पण खासगी आणि महापालिकेतील कोविड सेंटर पूर्ण भरले आहेत. त्यामुळे नव्या रुग्णांना खाट नाहीत. परिणामी रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.' असं वक्तव्य  महापालिका भाजपचे गटनेते शैलेश धात्रक यांनी केलं. 

दरम्यान, शास्त्री रुग्णालयात दररोज गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीतील सर्वच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा करुन ठेवावा, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात आपण काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांना पत्रही पाठवले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप राजू पाटील यांनी केला.