धक्कादायक! प्रदूषणामुळे डोंबिवलीतील रस्त्यांवर गुलाबी थर

त्यामुळे नागरिकांना डोळे चुरचुरण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

Updated: Feb 5, 2020, 05:28 PM IST
धक्कादायक! प्रदूषणामुळे डोंबिवलीतील रस्त्यांवर गुलाबी थर title=

मुंबई: रासायनिक कंपन्यांमध्ये होणारे अपघात आणि प्रदूषणामुळे अनेकदा चर्चेत असणाऱ्या डोंबिवली शहरात एक धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. याठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील (एमआयडीसी) रस्त्यांचा रंग प्रदूषणामुळे चक्क बदलला आहे. एमआयडीसीला लागून असणाऱ्या या रस्त्यांवर गुलाबी रंगाचा थर साचल्याचे दिसत आहे. यावेळी रस्त्यालगत असणाऱ्या गटारांमध्येही मोठ्याप्रमाणात रसायने (केमिकल) आढळून आली. संपूर्ण परिसरात या रसायनांचा दर्प पसरला आहे. त्यामुळे नागरिकांना डोळे चुरचुरण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

जावईबापू आता डोंबिवलीकडे लक्ष द्या; मनसेच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

यापूर्वी डोंबिवलीत रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे रासायनिक पाऊस पडल्याचा प्रकारही घडला होता. मात्र, तात्पुरत्या चर्चेनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा दुर्लक्षित राहिला होता. मात्र, आता निर्जीव वस्तूंवरही प्रदुषणाचा परिणाम व्हायला लागल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासन आता काय पावले उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सगळ्याची गंभीर दखल घेतल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्री सुभाष देशमुख आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.