पंतप्रधानांना निवडणुकीचा प्रचार करण्यास बंदी घालावी- उद्धव ठाकरे

पंतप्रधान मोदींकडून जनतेला अवास्तव आश्वासने दिली जातात.

Updated: Aug 13, 2018, 10:06 PM IST
 पंतप्रधानांना निवडणुकीचा प्रचार करण्यास बंदी घालावी- उद्धव ठाकरे title=

मुंबई: निवडणूक आयोगाने पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना निवडणुकीच्या प्रचार करण्यापासून रोखावे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ते सोमवारी मुंबईत मार्मिक साप्ताहिकाच्या वर्धापनदिन सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर चौफेर टीका केली. 

 

अमित शहा यांनी निवडणूक आयोगाला 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या मागणीसाठी पत्र पाठवले आहे. ही सूचना चांगली आहे. मात्र, भाजपला फक्त निवडणुकांमध्येच रस असल्याचे दिसते. एकवेळ रेशन नसेल तरी चालेल मात्र इलेक्शन हवं, अशी भाजपचे धोरण असल्याची टीका उद्धव यांनी केली. 
 
 रोजगार आणि इतर गोष्टींची अवस्था बघता सरकार निव्वळ बोलघेवडेपणा करत असल्याचे दिसते. मग पूर्वीच्या आणि या सरकारमध्ये फरक तो काय? एकीकडे पंतप्रधान मोदी मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती झाल्याचा दावा करतात. मात्र, नितीन गडकरी नोकऱ्याच नसल्याचे सांगतात. मग विश्वास ठेवायचा तरी कुणावर? हा भ्रमाचा भोपळा मोठा दिवसेंदिवस मोठा होत चालला आहे, असे उद्धव यांनी म्हटले. 

शिवसेनेला भाजपचा 'वन नेशन वन इलेक्शन' प्रस्ताव मान्य आहे. मात्र, हे करताना निवडणूक आयोगाने पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पक्षाचा प्रसार करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. 

तसेच जुमलेबाजीने देशाचा घात केलाय. पंतप्रधान मोदींकडून जनतेला अवास्तव आश्वासने दिली जातात. मात्र, आम्ही वास्तव लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला तर शिवसेना नकारात्मक पद्धतीने वागत असल्याचा प्रचार केला जातो. त्यामुळे जनता आश्वासन देणाऱ्यांनाच मते देते, अशी खंतही यावेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.