Durga Bhosle Death: आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय महिला पदाधिकाऱ्याचं निधन! शेवटचा Insta Video चर्चेत; आदित्यही हळहळले

Durga Bhosle Shinde Died of Heart Attack: बुधवारी ठाण्यामध्ये झालेल्या आदित्य ठाकरेंच्या सभेलाही त्या उपस्थित होत्या. त्यांनी पोस्ट केलेला शेवटचा इन्स्ताग्राम व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

Updated: Apr 6, 2023, 12:02 PM IST
Durga Bhosle Death: आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय महिला पदाधिकाऱ्याचं निधन! शेवटचा Insta Video चर्चेत; आदित्यही हळहळले title=
Durga Bhosle Shinde Died

Durga Bhosle Shinde Died of Heart Attack: युवासेनेच्या मुंबईमधील सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचं आकस्मिक निधन झालं आहे. दुर्गा भोसले यांना काल हृदयविकाराचा तिव्र झटका आला. त्यांना बॉम्बे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे हदयविकाराचा झटका येण्याच्या काही तास आधीच दुर्गा भोसले यांनी इन्स्टाग्रामवर ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरुन शिंदे सरकारवर टीका करणारा व्हिडीओ पोस्ट केला होता. आता या व्हिडीओ खाली कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही ट्वीटरवरुन दुर्गा भोसलेंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

वकिलीचं शिक्षण घेतलेल्या दुर्गा भोसले-शिंदे या प्रत्यक्ष मैदानावर उतरुन काम करण्याबरोबरच सोशल मीडियावरही फार सक्रीय होत्या. काल ठाण्यातील सभेमध्येही दुर्गा उपस्थित होत्या. याच ठिकाणी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना बॉम्बे हॉस्पीटलला हलवण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आपण आदित्य ठाकरेंच्या समर्थक आहोत असं त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवलं होतं. कालच ठाण्यामध्ये आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या सभेच्या दिवशी दुर्गा यांनी इन्स्टाग्रामवरुन ठाण्यात घडलेल्या प्रकरणाचा निषेध करणारा व्हिडीओ पोस्ट केला होता. 

काय म्हणाल्या होत्या व्हिडीओमध्ये?

इनस्ताग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दुर्गा यांनी ठाण्याच्या प्रकरणावर भाष्य करताना हे सारं कायद्याच्या विरोधात असल्याचं म्हटलं होतं. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये महिलांवर अन्याय करणाऱ्यांचे हात कलम केले जायचे. त्यांचा कडेलोट व्हायचा. आता त्याच महाराजांच्या महाराष्ट्रात हे काय चाललं आहे? हाताने कलम लिहिताना अडचण येते. पिडीतांकडे पाहिलं जात नाही. ही शोकांकिका आहे. सोशल मीडिया ते आयसीयूपर्यंत. सोशल मीडियावर झालेला एक किरकोळ वाद तुम्हाला थेट हॉस्पीटलपर्यंत पोहचवतो. सोशल मीडियावर कोणतही आक्षेपार्ह किंवा अपमानास्पद विधान केलं जात असेल तर त्याची नोंद किंवा तक्रार सायबर सेलकडे करु शकता. पण ही कायदा हातात घेण्याची पद्धत अतिशय अयोग्य आहे," असं दुर्गा यांनी म्हटलं होतं.

"रोशनी दिपक शिंदे या युवासेनेच्या वाघीणाला 15 ते 20 जणी एकत्र येऊ मारहाण करतात. ते ही तिच्या कामाच्या ठिकाणी. तिच्या वर्तमानासहीत तिच्या भवित्यव्याला हानी पोहचवण्याचा हा कार्यक्रम आहे. सदर घटनेचे जे आवश्यक प्रमाण आहेत ते सर्व उपलब्ध असतानाही पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. त्याऐवजी रोशीनीवरच दोन गुन्हे दाखल केले. जेव्हा उद्धवसाहेब, रश्मी वहिनी आणि आदित्यसाहेब रोशनीला भेटायला रुग्णालयात गेले. लगेचच ते सीपी ऑफिसला जात होते हे कळाल्यानंतर पोलीस कमिश्नर अज्ञात वासात गेले. म्हणजे आवाज उठवणाऱ्याचं तोंड दाबायचं आणि न्याय मागितला तर तोंड फिरवायचं. शिवसेनेच्या परिवाराला नाहक त्रास देण्याचं काम केलं जातंय. शिवसेनेचे वरिष्ठ नेते, आमचे पदाधिकारी, महिला आघाडी, मित्र पक्षाचे पदाधिकारी असो यांच्यावर हल्ले झालेत, आक्षेपार्ह विधानं झाली आहेत. पण त्यांच्यावर एक तरी कारवाई झाली आहे का? तर उत्तर आहे. आपल्या व्हॉइस ऑफ डिसेंटला बंद करायचं आहे. शिवसेनेचे पदाधिकारीच नव्हे तर पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबांना त्रास दिला जात आहे," असंही दुर्गा यांनी या व्हिडीओत म्हटलं होतं.  

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

दुर्गा भोसले-शिंदे यांचं निधन झाल्याचं ऐकून फार दु:ख झालं. आपण आपल्या सर्वाधिक कष्ट करणाऱ्या आणि प्रेम मनाच्या युवासैनिकाला गमावलं आहे. युवासेनेला त्यांच्या जाण्याने झालेलं दु:ख शब्दात मांडता येणार नाही, ओम शांती! असं ट्वीट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

दुर्गा भोसले यांच्या निधनामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.