Durga Bhosale-Shinde passed away : युवा शिवसेना सचिव दुर्गा भोसले - शिंदे यांचे काही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दुर्गा यांना बॅाम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू अशी दुर्गा भोसले - शिंदे यांची ओळख होती. युवा शिवसेनेच्या माध्यमातून राज्यभरात संघटनात्मक बांधणीत त्यांचा मोठा हातभार होता. त्यांच्या जाण्याने ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाले आहे. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दुर्गा भोसले-शिंदे यांच्या पश्चात पती, आई, वडील केशवराव भोसले आणि भाऊ असा परिवार आहे.
ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिलांकडून मारहाण केली. मात्र, पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला. याविरोधात महाविकास आघाडीने ठाण्यात मोर्चा काढला. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाण्यात निघालेल्या जनआक्रोश मोर्चात युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे सहभागी झाल्या होत्या. मात्र यावेळी चालताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तातडीने मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे दाखल केले होतं. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले.
दुर्गा यांच्या निधनाचे वृत्ताने मन सुन्न झाले आहे. आमचा एक अत्यंत मेहनती आणि दयाळू युवासैनिक आम्ही आज गमावला आहे. युवासेना परिवाराला झालेला शोक व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. ओम शांती' , असे म्हणत माजी मंत्री आणि युवानेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलेय.
Heartbroken to hear that @nowdurga ji is no more. We’ve lost one of our most hard working and kind hearted Yuva Sainik.
Have no words to express the grief felt by us in the Yuva Sena.
Om shanti— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 5, 2023
युवासेना परिवारातील हरहुन्नरी कर्तृत्वान रणरागिणी म्हणून दुर्गा भोसले-शिंदे यांची ओळख होती. दुर्गा यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर युवासेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वांनाचा मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील राहत्या घरातून आज संध्याकाळी सहा वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. तर बाणगंगा स्मशानभूमी, वाळकेश्वर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
युवासेना सचिव दुर्गा भोसले शिंदे यांनी अनेक महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. त्यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिननिमित्त सोफिया कॉलेज येथे महिला आणि युवतींसाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण त्यांनी दिले. तसेच असेच कार्यक्रम त्या राज्यात राबत असत. दुर्गा या महिला व युवतींना मार्गदर्शन करत असत.