मुंबई : आर्थिक डबघाईत गेलेल्या जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांना परदेशात जायला मनाई करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर या दोघांना परदेशात जाण्यापासून अधिकाऱ्यांनी रोखलं. गोयल दाम्पत्य दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांच्या दुबईला जाणाऱ्या एमिरेट्सच्या ई के - ५०७ या विमानानं परदेशी जाण्यासाठी मुंबई विमानतळावर आलं होतं. मात्र तिथे त्यांना रोखण्यात आलं.
या प्रकरणी प्रतिक्रियेसाठी नरेश गोयल प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. तर एमिरेट्स विमान कंपनीकडूनही अजून प्रतिसाद मिळालेला नाही. विशेष म्हणजे नरेश गोयल आणि जेटचे इतर संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पासपोर्ट ताब्यात घेण्याबाबतचं पत्र गेल्या महिन्यात जेट एअरवेज कर्मचारी संघटना अध्यक्ष किरण पावसकर यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना लिहिलं होतं.
१७ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून जेट एअरवेजने आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.जेट एअरवेजचा कारभार सुरु ठेवण्यासाठी तब्बल ४०० कोटी रुपयांच्या निधीची गरज होती. त्यासाठी जेट नव्या गुंतवणूकदारांकडे आस लावून बसली होती. मात्र, कोणत्याही बँकेने अर्थसहाय्य न दिल्यामुळे अखेर जेटची सेवा ठप्प झाली. यामुळे जेटचे तब्बल २० हजार कर्मचारी रस्त्यावर आले होते. यामध्ये १६ हजार ऑन पे रोल आणि सहा हजार कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी काही कर्मचाऱ्यांना स्पाईस जेट आणि विस्तारा एअरलाईन्सने नोकरी देऊ केली होती.
हवाई सेवा क्षेत्रातील दुसरी मोठी कंपनी राहिलेल्या जेट एअरवेजवर सध्या स्टेट बँकेचे वर्चस्व आहे. कंपनीकडे स्टेट बँकेसह विविध १८ व्यापारी बँकांचे ८,००० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. ही सेवा सुरू राखण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे आंशिक वेतन देण्यासाठी आवश्यक निधी बँकेने नाकारल्याने जेटचा डोलारा पूर्णपणे कोलमडला आहे.