मंत्रालयात विष पिऊन शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

  प्रकल्पात गेलेल्या शेत जमीनीला योग्य मोबदला न मिळाल्याने त्रस्त असलेल्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील धर्मा मंगा पाटील नावाच्या 70 वर्षीय शेतकऱ्यांना मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. 

Updated: Jan 22, 2018, 08:50 PM IST
मंत्रालयात विष पिऊन शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  प्रकल्पात गेलेल्या शेत जमीनीला योग्य मोबदला न मिळाल्याने त्रस्त असलेल्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील धर्मा मंगा पाटील नावाच्या 70 वर्षीय शेतकऱ्यांना मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. 

धर्मा पाटील यांची विखरण गावातील जमीन औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी गेली आहे. पाच एकर जमीनीसाठी त्यांना अवघा चार लाख रुपयांचा मोबदला मिळाला होता. तर इतर शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा मोबदला मिळाला होता. 

 

याच बाबीचा धर्मा पाटील मागील तीन महिन्यांपासून विविध शासकीय कार्यालयात पाठपुरावा करत होते. मात्र त्यांची कुणीच दखल घेतली नाही. पाच एकर जमीनीचे चार लाख तर मिळाले, मात्र या चार लाखात जमीनीचा एक तुकडाही विकत घेणं शक्य नसल्याने चिंतेत असलेल्या आणि शासन दरबारी दाद मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या धर्मा पाटील यांनी आज मंत्रालयात येऊन आपलं गाऱ्हाणं मांडण्याचा प्रयत्न केला. 

मात्र इथेही दाद न मिळाल्याने निराश झालेल्या या शेतकऱ्यांने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना पोलीसांनी तात्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.