मुंबई : गेल्या चार दिवसांपासून शेतकरी संप सुरु आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेय. या बंदला खासदार राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला असताना आता शिवसेनेनेही आपला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे आंदोलनाची धार अधिक वाढली आहे.
शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केलाय. मुंबई बंद वगळून हा पाठिंबा असणार आहे. उद्याच्या महाराष्ट्र बंदला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे.
कर्जमुक्तीच्या लढयात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलेय.
दरम्यान, पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीने संप मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सोमवार दि. ५ पासून महाराष्ट्र बंदचा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतला. यावेळी अजित नवले, बुधाजीराव मुळीक, रामचंद्रबापू पाटील आणि रघुनाथ दादा पाटील आदी शेतकरी नेते या बैठकीस उपस्थित होते.
शेतकरी संपाचे पुढील धोरण ठरवण्यासाठी आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत शेतकरी नेत्यांनी पुढील चार दिवस हा संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे आश्वासन न देता प्रत्यक्ष कृती करावी, अशी मागणी बैठकीस उपस्थित शेतकरी नेत्यांनी केली. तसेच महाराष्ट्र बंदची हाक देत शेतकऱ्यांच्या लढ्यात राज्यातील अडत व्यापारी, वाहतूकदार, नागरिक यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही यावेळी केले.