मुंबई : मान्सूनबाबत चांगली बातमी आहे. येत्या २४ तासात मान्सूनच्या हालचालीत वाढ होईल आणि पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. यानुसार कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात मान्सूना पोषक वातावरण आहे. मुंबई आणि उपनगरात पावसाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण झाले असून येत्या २४ तासांत मान्सूनच्या हालचाली वाढतील, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केलाय.
उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील २४ तासांत पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मान्सूनपूर्व वातावरण तयार झालेय. काल त्याचाच प्रत्यय आला. अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला.
दक्षिण अरबी समुद्रात मान्सून सक्रीय झाला आहे. त्यामुळे मान्सूनची वाटचाल समाधानकारक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरवर्षी मान्सूनचे ५ जूनला गोव्यात आगमन होते. परंतु मान्सून सक्रीय झाल्याची घोषणा झालेली नाही. मात्र गोव्यात मान्सूनपूर्व वातावरण तयार झाले आहे. १० जूनला मान्सून मुंबईत दाखल होण्याची अपेक्षा आहे.