मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा शनिवारी विश्वासदर्शक ठराव

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि नव्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव उद्याच मांडण्याची शक्यता आहे. 

Updated: Nov 29, 2019, 01:51 PM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा शनिवारी विश्वासदर्शक ठराव

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि नव्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव उद्याच मांडण्याची शक्यता आहे. त्यासाठी उद्याच विधानसभेचे विशेष अधिवेशन भरवण्याची शक्यता आहे. सर्व आमदारांचा २७ तारखेला शपथविधी झाला आहे. त्यामुळे आता केवळ विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया बाकी आहे. 

नव्या ठाकरे सरकारसाठी बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी ३ डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. त्याआधी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सर्व पक्षांचे आमदार गेल्या काही दिवसांपासून मुंबईतच आहेत. त्यामुळे त्यांना लवकर मोकळे करता यावे यासाठी उद्याच ही सर्व प्रक्रिया पार पाडण्याचा नव्या सरकाचा प्रयत्न आहे.

 नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज ते मंत्रालयात मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. आजपासून महाराष्ट्र विकासआघाडीच्या कारभाराला सुरुवात होणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यासोबत शपथ घेतलेले मंत्रीही आज आपल्या कार्यालयाचा पदभार स्वीकारणार आहेत. 

दरम्यान,  मुख्यमंत्री ठाकरे हे शेतकऱ्यांसंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.  आपला पदभार स्वीकारल्यानंतर ते कामाला लागणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर म्हणालेत, मी एक चांगले सरकार देऊ, असे राज्यातील जनतेला मी आश्वासन देऊ इच्छित आहे. मला अशा पद्धतीने मदत करायची आहे ज्यामुळे ते आनंदी होतील.