या कारणामुळे काँग्रेसला हवीय शिवसेनेची सोबत

महाराष्ट्र प्रदेश आणि मुंबई प्रदेश काँग्रेसनं मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचे संकेत दिले असले तरी या निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेवकांना शिवसेनेची साथ हवीय.   

Updated: Feb 4, 2022, 03:22 PM IST
या कारणामुळे काँग्रेसला हवीय शिवसेनेची सोबत  title=

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी राज्यात यापुढे स्वबळावर लढविण्याचा सूर आळविला. त्यांपाठोपाठ मुंबई प्रदेश अध्यक्ष आ. भाई जगताप यांनीही मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचे संकेत दिले. मात्र, काँग्रेसच्या नगरसेवकांना शिवसेनेची साथ हवीय.

मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयात अध्यक्ष भाई जगताप यांच्या उपस्थितीत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी बहुतांश नगरसेवकांनी शिवसेनेसोबत युती करण्याचा सूर आळवला. राज्यातील सत्तेत एकत्र असताना पालिका निवडणुकीत त्यांच्या विरोधात लढणं त्रासदायक ठरणार असल्याचं मत या नगरसेवकांनी व्यक्त केलं.

परंतु, काही नगरसेवकांनी मात्र शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली. शिवसेना आणि आपली विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर अल्पसंख्यांक समाज दूरावला जाण्याची भिती शिवसेना विरोधातील नगरसेवकांनी व्यक्त केली.

मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी म्हणून वॉर्डची पुनर्रचना करण्यात आली आहे. ही वॉर्डची पुनर्रचना शिवसेनेनं आपल्याला सोयीस्कर अशी केल्याचा सूर या बैठकीत उमटला. त्यामुळंच बहुतांश काँग्रेस नगरसेवकांचा सूर बदलला अशी चर्चा आहे.