मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे राज्य सरकार मोठे निर्णय घेताना दिसत आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहिर केला. परंतु या योजनेमध्ये त्रुटी असल्याचे सांगत मनसे आमदार राजू पाटील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहले आहे.
१ मे रोजी राज्यातील १०० टक्के रुग्णांना मोफत उपचार देण्याची घोषणा करण्यात आली होती. मग आता पांढऱ्या कार्डधारकांकडून बिल का आकारले जात आहेत? रेशनकार्ड पाहून उपचार केले जातील का? असा प्रश्न त्यांना ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.
१ मे रोजी राज्यातील #corona_positive १०० टक्के रुग्णांना मोफत उपचार देण्यात येतील अशी घोषणा केली होती, मग आता पांढऱ्या रेशनधारकांना बिल का आकारले जात आहे ? #corona मुळे सर्वच व्यवहार ठप्प पडले असताना रेशनकार्डचा रंग बघून उपचार दिला जाईल का ?@CMOMaharashtra @rajeshtope11 pic.twitter.com/cVsbpmRqTS
— Raju Patil (@rajupatilmanase) May 17, 2020
राज्यावर कोरोनाचे संकट वाढत असताना काही खासगी रुग्णालये मनमानी पध्दतीने दर आकारणी करीत होते. त्यांना चाप लावण्यासाठी घेतलेला हा निर्णय योग्य होता. परंतु असा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील सर्व रुग्णालयांना परिपत्रक काढून कळविणे आवश्यक होते तसे परिपत्रक काढलेले नाही त्यामुळे आजही रुग्णांना मोफत उपचार मिळताना दिसत नाहीत, असे या पत्रात राजू पाटील यांनी म्हटले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील शास्त्रीनगर रुग्णालय हे कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर कल्याण मधील हॉलीक्रॉस, डोंबिवली मधील आर.आर. आणि ठाणे येथील नियॉन या खासगी रुग्णालयांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे.
त्यामुळे या विषयाची दखल घेऊन राज्यातील सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत उपचार देण्याबाबतच्या निर्णयाबाबत सर्व रुग्णालयांना स्पष्ट आदेश द्यावेत अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.