गणेशोत्सवाच्या उत्सवात सोन्याचा व्यापार मात्र मंदावला

सोन्याच्या कारखान्यांमध्ये सध्या नाराजी.

Updated: Aug 16, 2019, 06:51 PM IST
गणेशोत्सवाच्या उत्सवात सोन्याचा व्यापार मात्र मंदावला title=

दीपाली जगताप-पाटील, झी मीडिया, मुंबई : गणेशोत्सवाची लगबग सुरु असताना ऐन उत्सवात सोन्याचा व्यापार मात्र मंदावला आहे. त्यामुळे सोन्याच्या कारखान्यांमध्ये सध्या नाराजी आहे. गणपतीच्या गळ्यामध्ये मोत्याची माळ, सोन्याचे दागिने नेहमीच शोभतात. यंदा मात्र गणेशोत्सव तोंडावर आला तरीही दागीने घडवण्यासाठी प्रसिद्ध असलेले गिरगावातले कारखाने ओसच आहेत. नाना वेदक हे गेल्या 45 वर्षांपासून बाप्पासाठी दागिने घडवतात. मात्र सोन्याची किंमत प्रति तोळा 40 हजाराच्या घरात गेल्यामुळे मोठमोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडूनही दागिन्यांना मागणी नाही. राज्यभरातील 40 ते 50 मंडळांकडून दागिन्यांच्या ऑर्डर येत असतात. यंदा हा आकडा १५ ते २०च्या घरात आला आहे.

यंदा गणेशोत्सवातला सोन्याचा व्यापार तब्बल 60-70 टक्यांनी घटला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ 26-30 टक्केच मागणी आहे. 
एका दागिन्याची किंमत गेल्या काही वर्षांच्या तुलनेत दुपटीनं वाढल्याचा फटका बसला आहे. सध्या पाच किलो वजनाच्या सोन पावलांची किंमत अंदाजे 3 लाख रुपये आहे. त्याच प्रमाणे 200 ते 500 ग्रॅमचा हार 50 ते 70 हजारांना पडतो आहे. १०० ग्रॅमची भिकबाळी  25-30 हजारांच्या घरात आहे. तर मध्यम आकाराच्या मुकूटाचा भाव दीड ते दोन लाखांपर्यंत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं दागिन्यांची मागणी 2-3 महिने आधीच नोंदवतात. यंदा या मंडळांनी सोन्याचे दर कमी होण्याची प्रतीक्षा केली. मात्र दर वाढतच गेल्यामुळे त्यांनी मागणीच दिलेली नाही. केवळ गणपतीचे दागिनेच नव्हे तर आशिया खंडातील नावाजलेल्या झवेरी बाजारातील व्यापारीही चिंतेत आहेत. 

राज्यात गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना या सोने व्यापारी आणि कारागिरांना मात्र यंदा बाप्पा पावणार नाही, असंच दिसतं आहे.