मुंबई : मुंबईतील गोवंडीसुद्धा कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहे. ४ दिवसांपूर्वी गोवंडीमधील पंचशील चाळ, लुम्बिनी बाग येथे एक कोरोनाने मृत्यू झाला. त्यास ४ दिवस उलटूनही मृत व्यक्तीचे कुटुंबिय, नातेवाईक, संपर्कात आलेल्या व्यक्तींची सरकारतर्फे तपासणी केली गेली नाही. येथील स्थानिक सामाजिक सेवा संस्था राहुल सेवा मंडळातर्फे काल मुख्यमंत्र्यांना ई-मेल आणि ट्विटरद्वारे निवेदन दिले गेले. त्यात वस्तीतील सर्वच संबंधित लोकांची तात्काळ कोरोना टेस्ट आणि क्वारंटाईन करण्याची मागणी केली गेली होती.
सरकारतर्फे तर टेस्ट नाही केली गेली पण पंचशील चाळीतील ६ जणांनी दुसरीकडून टेस्ट करून घेतली होती. त्यात ४ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने आज (३० एप्रिल) सकाळी १० वाजता येथील पंचशील चाळीत सरकारी कर्मचारी येऊन ६ जणांना क्वारंटाईन शिक्का मारून गेले आणि पॉझिटिव्ह व्यक्तींना रुग्णालयात हलवणार असल्याचे कळवले.
याचा अर्थ नागरिकांनी असेच आपल्या परीने टेस्टिंग करावे मग त्यांच्यासाठीच कारवाई होणार काय? संपूर्ण चाळीतील रहिवाश्यांचे काय? ही सरळसरळ टेस्ट आणि क्वारंटाईनसाठी संख्या कमी करण्याची पद्धत आहे.
गोवंडीतील आरोग्य खात्यातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी केवळ गोवंडीत ६० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सील केलेल्या पंचशील चाळीतील रहिवाश्यांना अजूनही सार्वजनिक शौचालय वापरावे लागत आहे.
या भागात कोरोनाचा संसर्ग आणखी टाळण्यासाठी सरकार केव्हा तातडीने योग्य पावले उचलणार ? असा रहिवाश्यांचा प्रश्न आहे. इतरांना बाधा होण्याआधी तातडीने येथून दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी हलवले जावे. लुम्बिनी बाग, गोवंडी येथील दलित, शोषित जनतेकडे सरकार कसे पाहते हे यातून दिसून येते.