मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडून १० हजार कोटींची तरतूद करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नुकसानीचे पंचनामे तातडीने केले जातील, वेळेत पंचनामे न झाल्यास नुकसानीचे फोटोही ग्राह्य धरले जातील असंही मुख्यमंत्री म्हणाले.
नुकसानीची अधिकृत आकेडेवारी हाती आल्यानंतर तीन ते चार दिवसांत तातडीने मदत केली जाणार असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत जमा होणार आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अनिल बोंडे आणि विजय शिवतारे उपस्थित होते.
अवकाळी पावसानं राज्यातील शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घेतला. राज्यातील ३२५ तालुक्यांमधील ५४ लाख २२ हजार हेक्टरवरील पीकं बाधित झाली आहेत. यामध्ये ज्वारी, मका, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिकं यांचा समावेश आहे. नुकसान झालेल्या भागांचं तत्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार शनिवारी घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींच्या तरतूदीचे आदेश देण्यात आले आहेत.