जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : दहीहंडी हा एक सण आहे, या सणात खेळला जाणारा हा खेळ, आयपीएलला देखील टक्कर देऊ शकतो. पण यात व्यवस्थापनाची कमतरता, गोविंदांच्या सुरक्षिततेकडे होणाऱ्या दुर्लक्षातून, हा असुरक्षिततेच्या अडथळ्यांमध्ये अडकला आहे. मात्र युरोपात याचं जिवंत उदाहरण समोर येतंय की, हा खेळ आयपीएलपेक्षाही मोठा कसा होऊ शकतो, आणि असं नियोजन भारतात झालं, तर गोविंदा देखील आयपीएलच्या क्रिकेटर्सप्रमाणे मालामाल होतील, आणि अधिक सुरक्षित देखील. उत्साहाच्या भरात हातपायमोडून घेणाऱ्या गोविंदांना मदतीसाठी दुसऱ्यापुढे हात पसरण्याची गरज पडणार नाही.
मुंबईतील दहीहंडीप्रमाणे, स्पेनमध्ये देखील मानवी मनोरे लावले जातात. पण मुंबई आणि स्पेन यांची तुलना केली, तर फार मोठे फरक दिसून येतात.
स्पेनमध्ये मानवी मनोरे लावण्याची स्पर्धा स्टेडिअममध्ये घेतली जाते. ५, ६ नाही, तर ९ थर लावले जातात, वरच्या थरात बालगोविंदा असतात. ते किती सुरक्षित असतात, ते तुम्हाला व्हिडीओ पाहून नक्की कळेल. यावेळी डीजेचा दणदणाट नसतो, तर त्या बदल्यात बॅण्ड किंवा पारंपरिक वाद्य वाजवली जातात.
सर्व टीमचे गोविंदा हे खाली ग्राऊंडवर प्रत्येकाला सांभाळण्यासाठी जमलेले असतात. तर प्रेक्षक या मनोऱ्यांचा आनंद स्टेडिअममध्ये बसून घेत असतात, मोकळी जागा, आणि भरपूर सांभाळून घेणारे असल्याने, यात एक अनोखी मज्जा असते. येथे असुरक्षिततेची कोणतीच भीती वाटत नाही.
स्पेनमध्ये हा खेळ सुरू असताना, स्टेडिअममध्ये प्रतिष्ठीत ब्रॅण्डचे बॅनर झळकतात. यामुळे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक खूप मोठा असल्याचा अंदाज कुणालाही येईल, कारण स्टेडिअमच्या सर्व प्रेक्षक गॅलरी या जाहिरातींनी भरलेल्या असतात.
भारतातही या खेळाचं आयोजन स्टेडियममध्ये झालं तर गोविंदांच्या ५० ते १०० टीम एकानंतर एक थर लावू शकतील. स्टेडियमध्ये हा खेळ आल्यास त्याला जाहीरातदार आणि प्रेक्षक मिळतील. प्रसारणाचे हक्क विकता येतील. जखमी गोविंदांसाठी यातून काही शेअर्सकाढून, एकट्या जखमी गोविंदाला कोट्यवधीचं विमा संरक्षण देता येईल.
मोकळी जागा आणि एकाच वेळेस ५० ते १०० टीमचे गोविंदा खाली असल्याने आणि आणखी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि हेल्मेट पुरवल्याने अपघात कमी करता येतील हे नक्की.
थर लावण्याच्या आधी आणि नंतरच्या अवकाशात स्थानिक कलाकारांना त्यांची कला दाखवण्याची संधी देता येईल, यातून त्यांना देखील चांगला मोबदला मिळेल, सेलिब्रेटिंच्या सहाभागाने हा खेळ आणखी रंगारंग करता येईल.
आयपीएल आल्याने गल्लीतलं क्रिकेट बंद झालं नाही, वनडे, कसोटी सामने बंद झाले नाही. पण आयपीएलने अनेक खेळाडूंना आर्थिक पाठबळ दिलं, तसंच दहीहंडीतून गोविंदाना मिळू शकतं, अखेर वाह वा करणारे अनेक असतात, पण जखमी गोविंदांना आर्थिक मदत करणारे तेवढे अजिबात नसतात.