शक्यता: येत्या ४८ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पाऊस

महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असली, तरी अतिवृष्टीची शक्यता नाही.

Updated: Aug 21, 2018, 08:32 AM IST
शक्यता: येत्या ४८ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पाऊस title=

मुंबई: हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ४८ तासांत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातल्या अनेक भागात, मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांची चिंता काही अंशी कमी होणार आहे. केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, तसेच, मागील आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबारच्या विसरवाडीत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याचा हा अंदाज महत्वाचा मानला जातोय. महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असली, तरी अतिवृष्टीची शक्यता नाही.

मागील ४८ तास गडचिरोलीत मुसळधार पाऊस

दरम्यान, मागील ४८ तास गडचिरोलीत कोसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाने  दक्षिण गडचिरोलीचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. दक्षिण गडचिरोलीतील  दीना-प्राणहिता-वैनगंगा नद्या कोपल्या आहेत. या नद्यांना जोडणारे छोटे नदी-नाले पुराच्या पाण्याने दुथडी भरून वाहत आहे. परिणामी मुख्य राज्य मार्गांसह कित्येक महत्त्वाचे मार्ग बंद  झाले आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दक्षिणेच्या टोकावर असलेल्या  गोदावरी नदीत होणारा इतर नद्यांच्या पाण्याचा समावेश मंदावला आहे. छत्तीसगड सह ओरिसा राज्यात देखील तुफान पाऊस सुरु असल्याने गोदावरी नदीने विक्राळ रूप धारण केले आहे.

विदर्भातही पावसाचा जोर कायम

दरम्यान, तिकडे पूर्व विदर्भातही पावसाचा जोर कायम आहे. गडचिरोली जिल्ह्यातल भांमरागड गावात पुराचं पाणी शिरलंय.  पर्लकोटा नदीला मोठा पूर आल्यानं १०० गावांचा संपर्क पुन्हा एकदा तुटला आहे. भामरागडच्या बाजारवाडी चौकात पुराचं पाणी घुसलंय. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.

नांदेड जिल्ह्यात संततधार पाउस

नांदेड जिल्ह्यात संततधार पाउस सुरुच आहे .. संपुर्ण जिल्ह्यात पावसाची झड कायम आहे .. पावसामुळे नांदेड शहरातील अनेक रस्ते जलमय झालेत... मुख्य मार्गांवर मोठया प्रमाणात पाणी साचलं आहे... साचलेल्या या पाण्यातुन नांदेडकरांना मार्ग काढावा लागतोय... रस्त्यांसह शहरातील अनेक सखल भागांमध्ये देखील पाणी साचलेय... त्यामुळे नागरीकांचे हाल होत आहेत .. सखल भागांमध्ये पुर परीस्तीथी निर्माण झालेली असतांना पालीकेची यंत्रणा मात्र गायब आहे...