मुंबई: राज्य सरकारकडून मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याचे सांगण्यात येत असले तरी आता भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने ICMR शहरातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवा, असे निर्देश दिले आहेत. मुंबईत क्षमतेपेक्षा कमी चाचण्या केल्या जातात. रुग्णांची संख्या जास्त दिसू नये म्हणून राज्य सरकार जाणीवपूर्वक कमी चाचण्या करते, असा आरोप भाजपकडून सातत्याने केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ICMRकडून देण्यात आलेले निर्देश महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.
सध्याच्या घडीला मुंबईत दिवसाला फक्त ५५७९ कोरोना चाचण्या होतात. याउलट दिल्लीत दरदिवशी जवळपास १५ हजार कोरोना चाचण्या होत आहेत. त्यामुळे सध्या दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी मुंबईच्या तुलनेत दिल्लीचा मृत्यूदर कमी आहे. दिल्लीचा मृत्यूदर ६.४ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर आला. तर सुरुवातीच्या काळात जवळपास ८ टक्क्यांवर असलेला मुंबईचा मृत्यूदर चार ते सहा टक्क्यांपर्यंतच खाली उतरला आहे. राज्याच्यादृष्टीने ही चिंतेची बाब मानली जात आहे.
त्यामुळेच ICMR ने मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिल्याचा अंदाज आहे. चाचण्यांची संख्या वाढल्यास रुग्णांचे प्रमाण काही दिवस वाढेल. पण नंतर दिल्लीप्रमाणे हळुहळू रुग्णांची संख्या कमीदेखील होईल. तसेच मृत्यूदरही कमी होईल, असे ICMR चे म्हणणे आहे. १ ते २२ जुलै या कालावधीत मुंबईत १,२२,७५९ कोरोना चाचण्या झाल्या. तर दिल्लीत याच काळात ३,१९,५५९ कोरोना टेस्ट करण्यात आल्या.
आता हा मुद्दा प्रतिष्ठेचा किंवा कौतुकाचा न करता मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत दिवसाला १५ ते २० हजार कोरोना चाचण्या झाल्या पाहिजेत. जेणेकरून संसर्गाचे प्रमाण ५ ते १० टक्क्यांपर्यंत खाली आणता येईल. अन्यथा भयावह परिस्थिती उद्भवू शकते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. दरम्यान, शुक्रवारी राज्यात झालेल्या २७८ मृत्यूंपैकी मुंबईमध्ये सर्वाधिक ५४ मृत्यू झाले आहेत. मुंबईमध्ये आत्तापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या १,०६,९८० एवढी झाली आहे. यातले ७८,२५९ रुग्ण बरे झाले आहेत, तर २२,४४३ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. मुंबईमध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे ५९८४ जणांचा मृत्यू झाला आहे.