शिवसेना नेते संजय राऊत यांची सुरक्षा वाढवली

Sanjay Raut : आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.  

Updated: Sep 1, 2021, 12:14 PM IST
शिवसेना नेते संजय राऊत यांची सुरक्षा वाढवली  title=

मुंबई : Sanjay Raut : राणे आणि शिवसेनेतील संघर्षानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्याकडे सध्या वाय दर्जाची सुरक्षा आहे. (Increased security for Shiv Sena leader Sanjay Raut) नीलेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आणि राणे-शिवसेना वादानंतर ही सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

राणे-शिवसेना वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या सुरक्षेत ही वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राऊत यांच्या घरी आणि 'सामना'च्या कार्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवल्याने तिथे छावणीचे स्वरूप आले आहे.  

दरम्यान, नीलेश राणे यांनी दिलेल्या धमकीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या भांडुपमधील घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राऊत यांच्या वाय दर्जाच्या ताफ्यात सध्या सहा शस्त्रधारी SPU जवानांचा ताफा आहे. मात्र, आता त्यांच्या ताफ्यात दोन अतिरिक्त SPUचे जवान देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. 

राणे-शिवसेना वादानंतर आमदार नितेश राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी संजय राऊत यांना एक इशारा दिला होता. संजय राऊत जिथे दिसतील तिथे 'करेक्ट कार्यक्रम' करू, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतरच आता राऊत यांच्या सुरक्षेत ही वाढ करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले. भाजप-शिवसेना कार्यकर्ते पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. या सगळ्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये देखील मोठ्या शाब्दिक चकमकी झडल्या होत्या. तसेच 'सामना' हल्लाबोल चढविण्यात आला होता.