मोदी सरकारविरोधात इंडिया आघाडीची वज्रमूठ, शरद पवारांकडे 'या' महत्त्वाच्या पदाची जबाबदारी?

विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक आज मुंबईत होणार आहे. देशभरातील तब्बल 28 राजकीय पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात इंडिया आघाडीची वज्रमूठ तयार केलीय. या बैठकीसाठी विरोधी पक्षातील नेते मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीची जबाबदारी महाविकास आघाडीकडे आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 31, 2023, 01:43 PM IST
मोदी सरकारविरोधात इंडिया आघाडीची वज्रमूठ, शरद पवारांकडे 'या' महत्त्वाच्या पदाची जबाबदारी? title=

INDIA Alliance Meeting Mumbai : विरोधकांच्या इंडिया आघाडीची (I.N.D.I.A) दोन दिवस मुंबईत बैठक आहे. मुंबईत ग्रँड हयातमध्ये आज आणि उद्या देशभरातले विरोधक एकत्र येणार आहेत. सहा वाजेपर्यंत सर्व महत्त्वाचे नेते ग्रँड हयातमध्ये उपस्थित राहतील. 28 राजकीय पक्षांचे 63 प्रतिनिधी इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्षाची ताकद आजच्या मीटिंगच्या निमित्ताने पाहयला मिळेल. 'इंडिया' बैठकीसाठी विमानतळ परिसर आणि वाकोला इथल्या ग्रॅण्ट हयात हॉटेल इथं चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय, मुंबई पोलिस (Mumbai) दलाबरोबरच राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्यात.

इंडियाच्या बैठकीसाठी नेते मुंबईत दाखल झालेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (M.K.Stalin) मुंबईत पोहोचलेत. ते इंडियाच्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी स्टॅलिन यांचं स्वागत केलं. तर पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्तीही (Mehbooba Mufti) मुंबईत दाखल झाल्यायत. 

शरद पवारांवर 'ही' जबाबदारी
इंडिया आघाडीच्या संयोजकपदावर शरद पवारांची (Sharad Pawar) निवड होण्याची शक्यता आहे.. सध्या INDIA आघाडीच्या संयोजक पदासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेचं (Mallikarjun Kharge) नाव आघाडीवर आहे.. मात्र ऐनवेळी शरद पवार यांचं नाव पुढे येऊ शकते.. किंबहुना ऐनवेळी शरद पवार यांचं नाव पुढे करण्यासाठी इंडिया आघाडीतील काही नेत्यांनी तयारी केल्याची माहिती मिळतेय.. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडियाचं संयोजक बनायला नकार दिला, त्यानंतर संयोजकपदासाठी खरगेंचं नाव आघाडीवर आलं. मात्र आता अचानक शरद पवार (Sharad Pawar) इंडियाचे संयोजक होऊ शकतात अशी शक्यता आहे. इंडियाच्या संयोजकपदाची घोषणा आजच केली जाऊ शकते.. 

राहुल गांधी हे देशाचं नेतृत्त्व करणारे तरुण नेते आहेत. इंडिया आघाडी संयोजकपदाबाबत राहुल गांधींच्या नावाची बैठकीत चर्चा होईल. सर्व नेते चर्चा करून निर्णय घेतील अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिलीय. दरम्यान संध्याकाही राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत. टिळक भवनात राहुल गांधी काँग्रेसच्या राज्यातील सर्व आमदारांची भेट घेतील, त्यांच्याशी संवाद साधतील असं सांगितलं जात होतं. मात्र राहुल गांधींच्या टीमकडून अजूनही या संवादास हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे राहुल गांधींची आमदारांसोबतची बैठक रद्द झाल्यात जमा आहे असं समजतंय. 

वरळीत पोस्टरची चर्चा
मुंबईत आज इंडिया आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचं मतदार संघ वरळीत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असलेलं पोस्टर लावण्यात आलंय.. या पोस्टरवर 'शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही' असा संदेश देण्यात आलाय. हे पोस्टर कोणी लावले हे अद्याप कळू शकलेलं नाहीये.

पाटणा आणि बंगळुरूपाठोपाठ इंडिया आघाडीची मुंबईत होणारी ही तिसरी बैठक आहे... शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बैठकीचं यजमानपद स्वीकारलं असून, सत्ता नसलेल्या राज्यामध्ये पहिल्यांदाच इंडियाची बैठक होतेय... मुंबईत जे घडतं, त्याचे पडसाद देशभर उमटतात, हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळं इंडिया आघाडीच्या बैठकीत कोणता नवा राजकीय अध्याय लिहिला जातोय, याची उत्सूकता देशातल्या जनतेलाही आहे...