मुंबईत काम करण्यासाठी अमराठी हवाय! ज्वेलर्सची संतापजनक जाहिरात; फोन केल्यावर म्हणाले...

Non Maharashtrian For Jwellers Job:   अशी एक बातमी समोर आलीय, जी वाचून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 25, 2024, 12:35 PM IST
मुंबईत काम करण्यासाठी अमराठी हवाय! ज्वेलर्सची संतापजनक जाहिरात; फोन केल्यावर म्हणाले... title=
मुंबईत काम करण्यासाठी अमराठी हवाय!

प्रविण दाभोळकर, झी 24 तास, मुंबई: अशी एक बातमी समोर आलीय, जी वाचून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते. ज्या मुंबईसाठी आपल्या 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं, तिथे महाराष्ट्रातील नागरिकांचीच गळचेपी होत असल्याचं दिसून आलंय. देशाची आर्थिक असलेल्या मुंबईत अनेक मोठ्या कंपन्या, दुकाने आपला व्यवसाय करतात. पण येथील नोकरीत महाराष्ट्रातील माणसालाच  माणसालाच नोकरीत स्थान नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. महाराष्ट्रामध्ये इथल्या स्थानिकांना नोकरी नाही, असं लिहिण्याची हिम्मत इथल्या नोकऱ्या देणाऱ्या संस्थांना कशी काय होते? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. 

काय आहे जाहिरात?

'इनडीड' या नोकरीबद्दल माहिती देणाऱ्या वेबसाइटवर एक जाहिरात प्रसिद्ध झालीय. मरोळ येथील आर्या गोल्ड नावाच्या कंपनीतील डायमंड फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन मॅनेजरची रिक्त जागा भरली जाणार आहे. या पदावर काम करणाऱ्याला दरमहा 25 हजार ते 62 हजार 760 रुपये इतका पगार दिला जाणार आहे.ही नोकरी पूर्ण वेळ असून दिवसाच्या शिफ्टमध्ये काम चालणार आहे. यासाठी 5 वर्ष अनुभव असलेला पुरुष उमेदवार त्यांना हवाय. इथपर्यंत वाचून तुम्हाला सर्वकाही ठिक आहे, असंच वाटेल. पण यापुढे जे लिहिलंय चे वाचून तुम्हाला संताप अनावर होईल. कारण नोकरीच्या तपशीलामध्ये पुढे नॉन महाराष्ट्रीय असा उल्लेख करण्यात आला आहे. 

नॉन महाराष्ट्रीयनसाठी नोकरी

या नोकरीसाठी केवळ महाराष्ट्रीयन नसलेले (Non Maharashtrian) उमेदवार अर्ज करु शकतात, असा उल्लेख यात स्पष्टपणे करण्यात आलाय. मुंबईतील मरोळमध्ये ही नोकरी असून यांना महाराष्ट्रीयन नसलेला उमेदवार का हवाय? हे न उलगडणारं कोडं आहे. 

'मी महाराष्ट्रीयन आहे तर मला नोकरी मिळेल का?'

आम्ही या प्रकरणाच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला. इनडीडवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आम्ही फोन केला. तेथे एक व्यक्ती बोलत होती. मी महाराष्ट्रीयन आहे तर मला नोकरी मिळेल का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. पण त्याला याबद्दल माहिती नव्हती. संबंधित कंपनीतील एचआर सविस्तर सांगेल, असे म्हणून त्याने एका लॅण्डलाईनचा नंबर दिला. 

लॅण्डलाईन नंबरवर फोन केला रिसेप्शनवर फोन लागला. एचआरशी थेट बोलता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. तुमची माहिती आम्हाला व्हॉट्सअॅप करा, ती आम्ही एचआरला पाठवू, त्यानंतर त्या फोन करतील, असे उत्तर समोरुन देण्यात आले.

उशीरा सुचलं शहाणपण

 'झी 24 तास'कडून आर्या गोल्ड कंपनीसोबत वारंवार संवाद साधण्याचा प्रयत्न केला गेला. यासंदर्भात वृत्त दिल्यानंतर कंपनीला जाग आली आहे. त्यांनी आपल्या नोकरीच्या तपशीलातून 'नॉन महाराष्ट्रीयन' हा उल्लेख हटवला आहे. 

वारंवार असे प्रकार येतात समोर

याआधी देखील सोसायटीमध्ये मराठी माणसाला नोकरी मिळणार नाही, असे प्रकरण समोर आलं होतं. तसेच मराठी माणसाला सोसायटीत घर मिळणार नाही, असा प्रकारदेखील उघडकीस आला होता. खूप गाजावाजा झाल्यानंतर माफी मागितली जाते आणि असे प्रकार सुरुच राहतात. त्यामुळे नागरिकांमध्ये यातून संताप व्यक्त केला जातोय.