नदीत बुडणाऱ्या चार मुलांना गावकऱ्यानं वाचवलं, मात्र स्वतः बुडाला; कल्याणमधील धक्कादायक प्रकार

Kalyan Accident : कल्याणच्या उल्हास नदीत बुडणाऱ्या चार मुलांना गावकऱ्याने वाचवलं. मात्र मुलांना वाचवणारी व्यक्तीच नदीत बुडाल्याने खळबळ उडाली होती. स्थानिकांनी त्या व्यक्तीला बाहेर काढून रु्ग्णालयात दाखल केले होते.

आकाश नेटके | Updated: Oct 16, 2023, 09:38 AM IST
नदीत बुडणाऱ्या चार मुलांना गावकऱ्यानं वाचवलं, मात्र स्वतः बुडाला; कल्याणमधील धक्कादायक प्रकार title=

आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण : कल्याणच्या (Kalyan News) उल्हास नदीत (Ulhas River) चार मुले बुडाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  या चारही मुलांना वाचवण्यात आलं असून मात्र त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारी व्यक्तीच नदीत बुडाली होती. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करुन चार मुलांना जीवनदान देणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. त्या चार मुलांसाठी देवदूत ठरलेल्या व्यक्तीसाठीही डॉक्टरच देवदूत बनल्याचे समोर आलं आहे. 

कल्याण शहरातून वाहणाऱ्या म्हारळ जवळील उल्हास नदीत पोहण्यासाठी उतरलेली चार मुलं बुडत असतांना गावकरी अनिल राक्षेने त्यांचे प्राण वाचवले. मात्र त्यांना वाचवताना अनिल राक्षे हे नदीच्या गाळात रुतले. त्यामुळे राक्षे यांच्या नाका तोंडात पाणी गेले आणि ते बेशुद्ध पडले. मुलांना वाचवल्यानंतर राक्षे हे बुडू लागल्याने लोकांना त्यांना बाहेर काढलं. राक्षे यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका देखील बोलवण्यात आली.

त्यानंतर तात्काळ अनिल राक्षे यांना कल्याणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनिल यांच्या संपूर्ण शरीरात पाणी शिरल्याने ते तब्बल 26 तास बेशुद्ध होते. अनिल यांच्या छातीत आणि मेंदूत पाणी गेले होते. मात्र डॉक्टरांनी उपचार करून त्यांच्या शरीरातील संपूर्ण पाणी बाहेर काढले आणि अनिल राक्षे यांचा जीव वाचवला. घराचा आधारस्तंभ आणि कर्त्या पुरुषाला वाचवणारे डॉक्टर हे देवदूत असल्याची प्रतिक्रिया राक्षे यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

बेशुद्ध पडल्यानंतर अनिल राक्षे यांना रुग्णवाहिकेतील लोकांनी रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ राक्षे यांच्यावर उपचार सुरु केले. अनिल राक्षे यांच्या छातीत आणि मेंदुमध्ये पाणी साचलं होतं. ते सगळं डॉक्टरांनी बाहेर काढलं. त्यामुळे आता अनिल राक्षे यांची प्रकृती उत्तम असून ते खाऊ पिऊ शकत आहेत, अशी प्रतिक्रिया खासगी रुग्णालयाने दिली आहे.